
रविप्रकाश कुलकर्णी
जीव गुंतवला की, तंद्री लागते. तंद्री ही शांत तृप्ती आणि गाढ समाधानाच्या दिशेने नेते. त्या वाटेवर वखवखशून्य आयुष्याचा रोकडा अनुभव पदोपदी येत राहतो. हा सुखाचा मूलमंत्र मी आज सांगतो आहे असे नाही. परंपरेने तो पुन: पुन्हा आमच्या समोर येतो, पण आम्हालाच ते ठाऊक नाही त्याला काय करायचे ?
या गोष्टीचा पुनरुच्चार पुन्हा एकदा मी करतो. वाचकांच्या लेखी पुस्तक दिवस रोजच असतो. 23 एप्रिल हा पुस्तक दिवस आहे हे त्यांना सांगायची गरज नसते. गरज आहे ती माहीत नसणाऱयांसाठी. वाचन हे सुखनिधान आहे हे त्यांना सांगायलाच हवे. पुस्तक वाचनाने माणूस नवा होत जातो. त्याला नवनव्या गोष्टी दिसू लागतात, सुचू लागतात. सारे बदलाचे वारे सुरू होतात…
या बदलण्याने पुस्तक वाचायच्या आधीचा माणूस आणि पुस्तक वाचल्यानंतरचा माणूस यात नक्कीच फरक होतो. तो दिसतो आणि तो जाणवतोही. त्याचं उदाहरणं म्हणजे नागनाथ मंजुळे! त्याची ओळख करून द्यायला हवी असे वाटत नाही. ‘पिस्तुल्या’, ‘फॅन्ड्री’ ते ‘सैराट’पर्यंत त्याचा सिनेमाचा वारू चौफेर उधळत आहे, पण हाच नागराज एकेकाळी आत्महत्येच्या कडेलोटापर्यंत पोहोचला होता हे ठाऊक आहे का?
त्या विमनस्क अवस्थेत त्याच्या हाती चारुता सागर यांचा ‘नागीण’ नावाचा कथासंग्रह हाती पडला. त्याच्या ‘ब्लर्ब’वर लेखकाच्या म्हणजे चारुता सागर यांच्या भ्रमंतीबद्दल लिहिलेले होते. तो ब्लर्ब वाचून नागराजला वाटले, आपणदेखील भ्रमंती केली पाहिजे. या विचाराने त्याच्या डोक्यात असलेले दुष्ट विचार निघून गेले. एक नवे जग त्याच्यासमोर आले आणि त्यात तो ओढला गेला.
पुस्तक वाचनाने माणूस नवा होत जातो. या बदलण्याने पुस्तक वाचायच्या आधीचा माणूस आणि पुस्तक वाचल्यानंतरचा माणूस यात नक्की फरक होतो. तो दिसतो व जाणवतो. ते किती हे आता त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘घर बंदूक बिरयानी’पर्यंतचा प्रवास सांगतो.
वाचनाची हीच तर खासीयत आहे. एका वाक्याने माणसाचे सारे आयुष्य आरपार बदलू शकते. हाच अनुभव नागराजने आपल्या एका कवितेत मांडला आहे. त्यात तो म्हणतो की,
मी पुस्तकच परजतो.
या निर्घृण जगात एकटय़ा दुखऱया माणसाने
स्वरक्षणार्थ काही बाळगावे म्हणून पुस्तक बाळगतो.
मी कुठेही असलो तरी पुस्तक सोबत असतेच.
मी ते वाचत नसलो तरी ते पडून असते.
छातीवर घेऊन प्रेयसीसारखे.
वेळी अवेळी मला एकटा पाहून
धावून येणाऱया ओसाडावर
मी पुस्तक परजतो… तलवारीसारखे.
आज 23 एप्रिल… ग्रंथ दिन. या दिवशी डोंबिवलीत एक अपूर्व गोष्ट घडते आहे. जी आजपर्यंत कधीही घडलेली नसावी. आज पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत फडके रोडवर दुतर्फा पुस्तके मांडलेली दिसतील. जो कोणी येथे येईल त्याला एक पुस्तक चक्क ‘चकटफू’ म्हणजे फुकट मिळेल. वाचनाला उद्युक्त करणारा हा उपाम अपूर्व आहे. म्हणूनच त्याचे स्वागत करायला पाहिजे.





























































