‘गुगल’च्या मनमानीवर ‘पेटीएम’चा निशाणा, विदेशी कंपनीचा हिंदुस्थानात वरचढ बनण्याचा खटाटोप

डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने सोमवारी गुगलच्या मनमानी धोरणांवर जोरदार निशाणा साधला. गुगलसारखी विदेशी कंपनी हिंदुस्थानातील कायद्यापेक्षा वरचढ धोरणे बनवित आहे. मनमानी धोरणांच्या अंमलबजावणीतून हिंदुस्थानच्या डिजिटल मार्पेटमध्ये स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा गुगलचा खटाटोप सुरू आहे. गुगलने आपल्याला हिंदुस्थानात वैध असलेली कॅशबॅक ऑफर्स हटवायला भाग पाडले, असा आरोप पेटीएमने केला आहे. गुगल स्वतः मात्र ‘गुगल पे’च्या माध्यमातून अशा प्रकारच्या ऑफर्स देत असल्याचे पेटीएमने म्हटले आहे.

आम्ही हिंदुस्थानातील कायद्याला धरून व्यवसाय करीत आहोत. याउलट गुगल व या विदेशी कंपनीतील कर्मचारी हिंदुस्थानी कायद्याला धाब्यावर बसवून मनमानी, पक्षपाती धोरणे आखत आहेत. या धोरणांची जाचक पद्धतीने अंमलबजावणी केली जात असल्याचा आरोप पेटीएमने केला आहे. गुगलकडे ‘अॅण्ड्रॉईड’ या ऑपरेटींग सिस्टमची मालकी आहे. या सिस्टमवर हिंदुस्थानातील जवळपास 95 टक्क्यांहून अधिक स्मार्टफोन चालतात. ‘प्ले स्टोअर’ या गुगल अॅपचे धोरणही भेदभाव करणारे आहे. गुगलने डिजिटल मार्पेटमध्ये वरचढ बनवण्यासाठीच हे अॅप बनवले आहे, असा दावा पेटीएमने केला आहे.  गुगल हिंदुस्थानातून जाहिरातींच्या माध्यमातून अब्जावधी डॉलर्सची कमाई करते. असे असताना हिंदुस्थानात बनलेल्या अॅप्सच्या मानगुटीवर पाय ठेवून मोठे होण्याचे स्वप्न गुगल बघतेय, असा आरोपही पेटीएमने केला आहे.

गुगल-पेटीएमचे नेमके काय बिनसलंय?

19 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आयपीएल पर्वाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कॅशबॅक व इतर ऑफर्स दिल्या आहेत. पेटीएमनेही यूपीआय कॅशबॅक कॅम्पेन लॉन्च केले होते. परंतु 18 सप्टेंबरला पेटीएमला कल्पना न देताच गूगलने प्ले स्टोअरवरून पेटीएमचे अॅप काही तासांसाठी हटवले होते. त्यावरून पेटीएमने विदेशी गूगलला ‘स्वदेशी’ हिसका दाखवायला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या