
गोरेगाव येथील एका स्विमिंग पूलमध्ये पोहताना वृद्धाच्या अंगावर तरुण पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विष्णू सामंत असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.
ज्येष्ठ नागरिक असलेले विष्णू हे गोरेगाव येथील एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी नियमित जायचे. दोन दिवसांपूर्वी विष्णू हे नातवासोबत पोहण्यासाठी गेले होते त्यावेळी सायंकाळी विष्णू हे पोहत असतानाच एका तरुणाने वरून पाण्यात उडी मारली. तो तरुण विष्णू याच्या अंगावर पडल्याने ते जखमी झाले. जखमी अवस्थेत विष्णू यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.



























































