
राजेश देशमाने । बुलढाणा
गोवर-रुबेला मोहिमेसाठी मुस्लीम पालक नकार देत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्हयातील सर्व उर्दू शिक्षकांची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करून मुस्लीम समाजाला अफवांच्या व्हिडीओवर विश्वास न ठेवता ही लस घेणे आरोग्यासाठी कसे आवश्यक आहे हे मुस्लीम समाजाला पटवून देण्याची जबाबदारी टाकण्यात आली.
या बैठकीत सर्व मुस्लीम शिक्षकांनी व शिक्षक संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही आमच्या मुस्लीम समाजाला लस घेणे कसे आवश्यक आहे हे पटवून देऊ, असे आश्वासन दिले.
‘अपने कौम को नामर्द बनाने के लिए भाजप संघ सरकारने गोअर-रूबेला लस निकाली है’, असा व्हिडीओ जिल्हयातील मुस्लीम वस्तीत फिरल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लीम शाळांमधून ही लस घेण्यास नकार येत होता. आरोग्य विभागाने मदरसा मुस्लीम वस्तीत बैठक घेऊन अफवा खोडून काढत लस घेणे किती आवश्यक हे पटवून दिले होते. परंतु तरी देखील मुस्लीम पालक आपल्या मुलांना लस देण्यास नकार देत होते. म्हणून जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुगराजन एस यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या मार्गदर्शनात श्री शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद, बुलडाणा येथे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील कमी काम असणाऱ्या अथवा गोवर-रुबेला लसीकरणाबाबत पालकांची नकारात्मक भूमिका दिसून आलेल्या उर्दू माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापक, संस्था प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजातील नामांकित डॉक्टर्स, धर्मगुरू, विविध संघटना यांचे लसीकरण मोहिमेस साथ देण्याबाबत आवाहन करणाऱ्या ध्वनीचित्रफीत दाखवून माहिती देण्यात आली. शिक्षकांनी उपस्थित केलेले प्रश्न व शंकांबाबत संवाद साधून माहिती देण्यात आली.

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, आदींनी मोहिमेसाठी पाठिंबा असल्याचे जाहीर निवेदन जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण विभागाला दिले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र गोफने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जैनुद्दीन मकानदार, शिक्षणाधिकारी सुभाष वराडे, उपशिक्षणाधिकारी अनिल अकाळ, डॉ. नाफडे, डॉ. सावजी, डॉ. बडे, डॉ. खेरोडकर, डॉ. सलीम कुरेशी आदी उपस्थित होते. आरोग्य विभाग,शिक्षण विभाग व महिला बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुलडाणा जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे.



























































