गोवर रुबेला लसीकरणामुळे तीन विद्यार्थ्यांना त्रास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समना प्रतिनिधी । नांदेड 

बुलढाणा, हिंगोली पाठोपाठ अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष आणि कर्मचार्‍यातील समन्वयाच्या अभावामुळे गोवर रुबेला लसीकरण मोहिमेतंर्गत तीन विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या विद्यार्थ्यांना लस दिल्यानंतर त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात शासनाच्या वतीने गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातही या लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. परंतु संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे काही विद्यार्थ्यांना त्याचा त्रास भोगावा लागत असल्याचे ताजे उदाहरण पहावयास मिळाले आहे.

मुदखेड तालुक्यातील तिरकसवाडी येथील कृष्ण नवनाथ शिंदे (८) या विद्यार्थ्यास शुक्रवारी गोवर-रुबेलाची लस देण्यात आली होती. लस दिल्यानंतर अवघ्या अर्धा तासातच कृष्णाला उलट्या व जुलाबचा त्रास होऊ लागला. अवघ्या काही क्षणातच त्याच्या शरीरावर बारीक बारीक पुटकुळ्या येवून त्याचे शरीर तांबड्या रंगाचे जाणवू लागले. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर कृष्णाच्या नातेवाईकांनी त्याला विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर   उपचार सुरु आहेत. त्याच प्रकारे लोहा तालुक्यातील निळा येथील कृष्णा माधव तेलंग (८) व माहूर तालुक्यातील केदारगुडा येथील सुरज दिलीप पवार (९) या दोन्ही विद्यार्थ्यांना तशाच प्रकारचा त्रास होऊ लागल्याने विष्णूपुरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व्ही.आर.मेकाणे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.पी.कदम यांनी शासकीय रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची चौकशी केली.

दरम्यान अधिकारी व कर्मचार्‍यांनी परस्पर समन्वयाचा अभाव व योग्य ती काळजी न घेतल्यामुळे हा प्रकार घडल्याचे आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे.