
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी बुलढाणा येथील शासकीय कंत्राटदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मुंबईच्या लाच लुचपत विभागाने मुंबई येथे रंगेहात पकडले.
मलकापूर येथील शासकीय ठेकेदाराने बुलढाणा जिल्ह्यातील प्राथमिक आरोगय केंद्र नरवेलचे मुख्य इमारतीचे बांधकाम करण्याकरीता दीड कोटी रुपयांची निवीदा भरली होती. ई-निवीदाद्वारे त्यांना नमूद काम बहाल करण्यात आले होते. या कामाचा कार्यारंभ आदेशाकरिता यातील आरोपी नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शंकर सोनवणे यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली होती.
सततच्या पैशांच्या मागणीमुळे मलकापूरच्या शासकीय ठेकेदाराने लाच लुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. लाच लुचपत विभागाच्या अधिकार्यांची तक्रारीची पडताळणी केली. अधिकार्यांनी सापळा रचून तडजोडीअंती एक लाख रुपयांची रक्कम मुंबई येथे सुविधा विकास कक्ष, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोडवरील कार्यालयात फिर्यादीकडून स्वीकारताना लुचपत विभागाने रंगेहात पकडले.



























































