चीनवर हिंदुस्थानचा आणखी एक डिजिटल स्ट्राइक, आता 54 Apps वर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनशी (China) संबंधित कंपन्यांवर हिंदुस्थान सरकारने (Indian Government) पुन्हा एकदा मोठ्या कारवाईचे पाऊल उचलले आहे. हिंदुस्थान सरकारने चीनच्या आणखी एकूण 54 अॅपवर बंदी घातली आहे (China app ban in India). या अ‍ॅप्सवर वापरकर्त्यांचा डेटा चोरला असल्याचा आरोप असून हिंदुस्थानच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अॅप्स धोकादायक असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली आहे.

Beauty Camera, Sweet Selfie HD, Beauty Camera – Selfie Camera, Equalizer & Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock, Dual Space Lite या या अॅपवर कारवाई करण्यात आली आहे.

एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काही अ‍ॅप्सपासून राष्ट्रीय सुरक्षेस धोका असल्याचे आढळले आहेत, तर काही अ‍ॅप्स डेटा वाटप आणि गोपनीयता नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आता हे अॅप हिंदुस्थानमध्ये डाऊनलोड आणि अपडेट करता येणार नाहीत.

याआधी केंद्र सरकारने टिक-टॉकसह 59 अॅप्सवर बंदी घातली आहे. त्यांनतर PUBG सह आणखी अॅप्सवर कारवाई करण्यात आली होती. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर हिंदुस्थानने चिनी अ‍ॅप्सविरूद्ध कारवाई सुरू केली होती.

जून 2020 पासून हिंदुस्थानने टिकटॉक, शेअरइट, विचॅट, हॅलो, लाईक, यूसी ब्राऊजर, बिगो लाईव्ह, यूसी न्यूज, ईएस फाईल आणि पबजी सारखे लोकप्रिय अॅपवर बंदी घातली होती. त्यामुळे चीनचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. या कारवाईमुळे चवताळलेल्या चीनने हिंदुस्थानने नियमांचे उल्लंघन करत ही कारवाई केल्याची आवई उठवली होती.