
दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना काही त्रुटी राहतात. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महत्त्वाचे विषय फक्त पदव्युत्तर शिक्षक तपासणार असून एक शिक्षक दररोज फक्त 20 मुख्य परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणार आहेत. तसेच गुणवत्ता मूल्यमापनासाठी शिक्षकांनी दर तासाला केवळ तीन उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत.
दहावीच्या विज्ञान आणि सामाजिक शास्त्राच्या परीक्षेतील गुणवत्तेच्या मूल्यमापनासाठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांत पात्रता असलेले पदव्युत्तर शिक्षक आणि प्रशिक्षित शिक्षक सहभागी केले जातील. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापन पद्धतीचा विस्तार केला आहे. याशिवाय शिक्षकांना मदत करण्यासाठी भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या विषयांत पदव्युत्तर शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला.
पेपर तपासणीसाठी पुरेसा वेळ देण्यासाठी, मुख्य विषयांच्या 20 उत्तरपत्रिका आणि उर्वरित विषयांमध्ये 25 उत्तरपात्रिकांचे दररोज मूल्यमापन केले जाईल. शिवाय बोर्डाने पेपर तपासणीसोबत एक सहाय्यक ठेवला आहे, जो मूल्यमापनानंतर सर्व प्रश्नांची बेरीज आणि मूल्यमापन बरोबर आहे की नाही हे पाहणार आहे. मूल्यमापन केंद्रावर रविवार वगळता सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मूल्यांकनाचे काम केले जाणार आहे. ही 8 तासांची वेळ पूर्ण झाल्याशिवाय शिक्षकांना मूल्यांकन केंद्र सोडण्याची परवानगी नसेल, असेही सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.


























































