महावितरणच्या गो ग्रीनला उत्तम प्रतिसाद; साडेतीन लाख ग्राहकांनी नाकारले कागदी वीज बिल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणच्या गो ग्रीन मोहिमेला राज्यातील वीज ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार तब्बल  तीन लाख 57 हजार वीज ग्राहकांनी महावितरणचे कागदी वीज बिल नाकारत ऑनलाइन बिलाला पसंती दिली आहे. त्यामुळे संबंधित वीज ग्राहकांची प्रत्येक वीज बिलाच्यामागे दहा रूपयांची बचत होत असून महावितरणचीही कागदाबरोबरच आर्थिक बचत होत आहे.

राज्यभरात महावितरणचे दोन कोटी 70 लाख वीज ग्राहक असून त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल प्रत्येक महिन्याला त्यांना दिले जाते. त्यासाठी वीज वापराचे रीडिंग घेतल्यानंतर बिलाची छापाई करणे, ते संबंधित ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी सुमारे दहा-बारा रुपये खर्च येतो. ही वेळखाऊ प्रक्रिया असून अनेकदा वीज बिल ग्राहकांकडे पोहचत नसल्याच्या तक्रारी येतात. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना कागदी वीज बिलाऐवजी ग्राहकाच्या नोंदणीकृत ई-मेलवर पाठवण्याचा निर्णय 2018 मध्ये घेतला होता. त्यासाठी गो ग्रीन मोहीम सुरू केली असून आहे. ग्राहकाने गो ग्रीनचा पर्याय निवडल्यास प्रत्येक महिन्याच्या वीज बिलात दहा रुपयांची सवलत दिली जाते. त्यानुसार आतापर्यंत 3 लाख 57 हजार ग्राहकांनी गो ग्रीनचा पर्याय निवडला असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.