गुजरातमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, मुंद्रा बंदरावरून तब्बल 1150 कोटी रुपयांचे 118 किलो कोकेन जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये अंमली पदार्थ तस्कराविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि तटरक्षक दलाने एका संयुक्त कारवाईत तब्बल 118 किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. कच्छमधील मुंद्रा बंदरावरील एका बोटीत संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी ही शोधमोहीम राबवली होती. या प्रकरणी पोलिसांनी जुम्मा नासिर ओमेन या आफ्रिकन नागरिकाला अटक केली आहे.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे अंमली पदार्थ ब्राझिलमधून पाकिस्तानच्या मार्गाने हिंदुस्थानात आणले जात होते. तस्कर समुद्री मार्गाचा वापर करून गुजरातच्या किनाऱ्यावर ड्रग्ज पोहोचवण्याच्या तयारीत होते. तिथून ते दिल्लीला नेले जाणार होते.  दिल्लीतील केल्विन चुकवुमा आणि ब्यारुहंगा जेम्स या दोघांकडे तो माल पोहचवण्यात येणार होता.  या संपूर्ण नेटवर्कच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास आता सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

बंदरावर ATS पोलिसांनी धाड टाकल्याचे लक्षात येताच दोन तस्करांनी त्यांच्याकडील सर्व बॅगा समुद्रात फेकून दिल्या. त्यानंतर पोलिसांनी तटरक्षक दलाच्या जवानांच्या मदतीने समुद्रात फेकलेल्या पाच बॅगा ताब्यात घेतल्या. त्या बॅगांमध्ये एकूण 115 पॅकेट कोकन आढळून आले.

याप्रकरणी पोलिसांनी जुमा नासिर ओमर याला अटक केली तर त्याच्या सोबतचा साथिदार निंगिंटे नासोरो जुमान्ने याने पळून जाण्यासाठी समुद्रात उडी घेतली. तटरक्षक दलाचे जवान सध्या त्याचा शोध घेत आहेत. हे दोघे आरोपी हे टांझानिया या देशाचे रहिवासी आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी केल्विन चुकवुमा आणि ब्यारुहंगा जेम्स यांना देखील अटक केली असून ते दोघेही नायझेरियाचे रहिवासी आहेत.