गुरुपौर्णिमा आणि शिवसेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अमोल अशोक देवळेकर, पुणे

गुरुपौर्णिमा हा महत्त्वाचा हिंदुस्थानी सण. सणापेक्षा जास्त ही एक परंपरा आहे आपल्या मार्गदर्शक-शिक्षक-जीवनदर्शनाच्या तत्त्ववेत्त्याप्रति आदर दर्शविण्याची. राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीचे दर्शन घेतले. प्रश्न गुरुपौर्णिमेचा नाही, तर गुरूने दाखवलेला रस्ता व त्यावर मार्गक्रमण करण्याचा आहे. गुरूने घालून दिलेली नीतिमूल्यांची चौकट-उभारलेले आदर्श या साऱयाच गोष्टींचा आहे. शिवसेना व तिचे गुरू, त्यांनी शिवसेना व शिवसैनिक या गुरुशिष्य द्वैतात अपेक्षिलेले नाते आणि विचारांचा परीघ याचा मुळातून विचार व्हायला हवा. प्रश्न बंडखोरीचा नसून शिवसेना या वैचारिक संचिताच्या उत्तरदायित्वाचा, पर्यायाने शिष्याच्या कर्तव्याचा आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी उभ्या केलेल्या पायावर शिवसेनेची इमारत उभी राहिली आहे. प्रबोधनकारांना अपेक्षित हिंदुत्व-मराठी माणसाचे अधिकार-बहुजनवाद-वैदिक आणि सनातन्यांना विरोध या चार पायांवर शिवसेना उभी आहे. ज्या हिंदू धर्मसुधारणेचा प्रबोधनकारांनी आयुष्यभर पाठपुरावा केला त्या मातीतील मूळ बुद्ध व जैन विचारांना आदर देत संतपरंपरेला कवेत घेत मराठी मनाचे व्याकरण त्यांनी मांडले. प्रबोधनकारांनी ज्या ज्या अनिष्ट गोष्टींनी हिंदू धर्म बदनाम झाला, त्याविरुद्ध चळवळी उभ्या केल्या, प्रबोधन केले. जे विचारप्रवाह या हिंदुत्वाच्या मोठय़ा धारेत भर घालू शकतात त्या सगळ्यांचे स्वागत केले, पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व करताना नुसते मराठी माणसाचे अधिकार मागितले नाहीत, तर त्याला महाराष्ट्रधर्माचे अधिष्ठान दिले.

गेल्या अडीच वर्षांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा राज्यकारभार केला तो मराठी माणसाच्या मनात खोलवर ठसा उमटवून गेला आहे. कोविड काळात त्यांनी धरलेली विज्ञानाची कास… देशभरात धार्मिक उन्मादाचे वातावरण असताना सुसंवादी असणारं महाराष्ट्राचं समाजजीवन… सर्वांना सोबत घेत केलेला महाविकास आघाडीचा आगळावेगळा जरी असला तरी महाराष्ट्रीयन परंपरेतील प्रयोग… राजकारण व कुरघोडय़ांच्या पलीकडे जात मराठी जनतेसाठी घेतलेली कुटुंबवत्सल कुटुंबप्रमुखाची भूमिका ही खऱया अर्थाने प्रबोधनकार व बाळासाहेब यांना कर्तृत्वातून दिलेली ‘गुरुदक्षिणा’ होय. या परंपरेचा सन्मान करणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्यच आहे. निवडणुका येतात जातात, पद-प्रतिष्ठाही येतात जातात,निधी-स्थानिक राजकारण,पक्षीय मतभेद,भूमिका या सर्वांच्या पलीकडे ‘महाराष्ट्रधर्म’ हा सर्वात मोठा आहे, परंतु तत्कालीन फायद्यासाठी कुणी या विचारसरणीच्या गळ्यालाच नख लावत असेल तर तो शिष्य म्हणण्याच्या लायकीचा नाही. बाकी समाधीवर जाऊन फोटो काढणाऱया चेल्याचपाटय़ांची देशात कमतरता नाही.