
ज्ञानवापी मशीद प्रकरणातील हिंदू पक्षाचे वकील आणि अखिल भारतीय वैदिक सनातन संघाचे माजी अध्यक्ष जितेंद्र सिंह विसेन यांच्यावर मंगळवारी रात्री दिल्लीतील पटेल नगरमध्ये इंजेक्शनने हल्ला करण्यात आला. हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जितेंद्र यांना सुईसारख्या वस्तूने टोचल्याबरोबर अस्वस्थ वाटू लागले.
पोलिसांत या घटनेची तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच जितेंद्र यांना जवळच्या सरदार पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांना डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. नंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आठवड्याभरानंतर त्यांच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी केली जाईल. जिल्हा पोलीस उपायुक्त संजय कुमार सेन यांनी सांगितले की, सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासानंतर वस्तुस्थितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जितेंद्र सिंह विसेन मध्य दिल्लीतील बलजीत नगर भागात कुटुंबासोबत राहतात. ते काशीतील ज्ञानवापी मंदिराच्या प्रकरणात हिंदूंच्या बाजूचे वकील आहेत. मंगळवारी रात्रीचे जेवण करून ते फिरायला बाहेर पडले. यावेळी ते पटेल नगर रेल्वे स्थानकाजवळ पोहोचताच दोघेजण आले आणि त्यांच्या खांद्यावर इंजेक्शनसारखे काहीतरी टोचून पळून गेले.
जितेंद्र यांनी सांगितले की, हा हल्ला झाल्यानंतर त्यांच्या खांद्याला तीव्र जळजळ होऊ लागली. यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. जितेंद्र यांचे म्हणणे नोंदवून घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
























































