
पेट्रोल संपल्यामुळे दुचाकी रस्त्याने चालवित घेउन चाललेल्या दोघा मित्रांचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची चेन, दोन मोबाइल असा मिळून 30 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 1 जूनला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली.
याप्रकरणी कैलास कसबे (वय 38 रा. हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अश्विन कसबे आणि अंकुश अशी लुटलेल्यांची नावे आहेत. अश्विन आणि त्याचा मित्र अंकुश दुचाकीवरून 1 जूनला संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास काळेपडळ परिसरातून चालले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे ते चालल निघाले होते.
त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना दमदाटी करून अश्विनकडील 20 हजारांची चेन आणि 5 हजारांचा मोबाइल आणि अंकुशकडील पाच हजारांचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत



























































