गारपीटग्रस्तांना मिळेना नुकसानभरपाई, पारनेर महसूल व कृषी विभागाचा हलगर्जीपणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर तालुक्यातील निघोज मंडळातील काही गावांतील गारपीटग्रस्त शेतकऱयांना दोन महिने झाले तरी नुकसानभरपाई मिळाली नाही. महसूल विभागाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱयांना बसला आहे. खात्यावर पैसे वर्ग झाले नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आठ दिवसांतही मदत न मिळाल्यास तहसीलसमोर आंदोलनाचा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.

पारनेर तालुक्यातील पानोली, वडुले, सिद्धेश्वरवाडी, सांगवी सूर्या, गांजी भोयरे, जवळा, वडनेर हवेली गटेवाडी, पारनेर येथील शेकडो शेतकऱयांचे कांदा, मका, वाटाणा, ऊस, फळबागांसह मोठे नुकसान झाले. तब्बल चार ते साडेचार हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. परंतु पंचनामे होऊनही मदत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

सरकारने पंचनामे करून शेतकऱयांना एकरी नुकसानभरपाई जाहीर केली. काही शेतकऱयांना तातडीने पैसे दिले. परंतु अद्यापि अनेक शेतकऱयांना वेगवेगळ्या त्रुटी सांगून अजूनपर्यंत भरपाई दिली नाही. याबाबत तहसील कार्यालयात चौकशी केली असता, सर्व्हर बंद होते, अशी कारणे सांगितली जातात. येत्या 15 दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता असून, तसे झाल्यावरही नुकसानभरपाई मिळणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ नेते नारायण गायकवाड, संतोष खोडदे, अंकुश गायकवाड, बी. ए. भगत यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा
इशारा दिला.

तहसीलदारांचे दुर्लक्ष, शेतकरी वाऱयावर

तालुक्यात पंचनाम्याप्रमाणे नुकसानभरपाईचे पैसे महसूल विभागाकडे जमा झाले. मात्र, महसूल विभागाच्या ढीम्म कारभारामुळे तसेच तलाठी मंडलाधिकारी व पंचनाम्यात सहभागी असणाऱया अधिकाऱयांच्या गलथानपणामुळे नुकसानभरपाईचे पैसे शेतकऱयांच्या खात्यावर वर्ग होत नाहीत, याकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकऱयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.