
दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत राजकारण न करता मारेकऱ्यांना भरचौकात फाशी द्या, अशी मागणी केली आहे. तसेच या मुलीच्या वडिलांचा आक्रोश आहे समजून घेतला पाहिजे, मुलींनीही अधिक दक्ष राहिलं पाहिजे, असा सल्लाही दिला.
संजय राऊत म्हणाले की, ‘आमच्या महाराष्ट्रातील एका मुलीची ज्याप्रमाणे हत्या झाली ते अत्यंत धक्कादायक आणि दुर्देवी आहे’. अत्यंत कडक शब्दात त्यांनी सांगितलं की, ‘या घटनेवर राजकारण करणारे समाजाचे शत्रू आहेत.’
समाज माध्यामातून होणाऱ्या अशा ओळखींचा उल्लेख करत ते म्हणाले की, ‘समाज माध्यामातून अशा ओळखी होतात आणि त्याचं रुपांतर अशा भयंकर नात्यात होतं आणि ज्याप्रमाणे हाल करून तिला मारलं आहे तिच्या वडिलांची मुलाखत मी वाचत होतो त्यांचा आक्रोश आहे तो समजून घेतला पाहिजे. कोणत्या धुंदीत ही मुलं जगतात हे आज परत एकदा कळलं आणि आपला जीव गमावून बसले. ही केवळ विकृती नाही तर त्यापुढची गोष्ट आहे. खूनी हत्याऱ्यांवर खटले न चालवता, राजकारण न करता भर चौकात फासावर चढवले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच देशातील मुलींनी अशा घटना लक्षात घेत सावध राहिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.





























































