
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले म्हणून बीसीसीआयने निलंबित केलेला क्रिकेटपटू हार्दिक पंड्या हा निराश झाला असून त्याने घराबाहेर पडणेच बंद केले आहे. हार्दिकचे वडील हिंमांशू यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.
‘हार्दिकच्या क्रिकेट करिअरमुळे गेली अनेक वर्षे तो मकरसंक्रांतीला घरी नसायचा. त्याला पतंग उडवायला फार आवडते. मात्र यावर्षी तो घरी असूनही त्याने मकरसंक्रांतीचा सण साजरा केला नाही. ऑस्ट्रेलियाहून परतल्यापासून तो घरातून बाहेर पडलेला नाही. कुणाला भेटत नाही, कुणाचे फोन उचलत नाही. शांत असतो. बीसीसीआयने त्याच्यावर केलेल्या कारवाईमुळे तो निराश झाला आहे. तो अशी चूक पुन्हा करणार नाही याची त्याने खात्री दिली आहे. आम्ही व त्याचा मोठा भाऊ कृणाल सध्या त्याच्याशी या विषयी काहीच चर्चा करत नाही. सध्या आम्ही बीसीसीआयच्या निर्णयाची वाट बघतोय’, असे हिमांशू पंड्या यांनी सांगितले.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले म्हणून हार्दिक पंड्या व लोकेश राहुल यांना हिंदुस्थानी संघातून डच्चू देण्यात आला आहे. बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यांचा निर्णय येईपर्यंत या दोन्ही खेळाडूंना निलंबित करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे हे दोन्ही खेळाडू आयपीएल तसेच वर्ल्डकपला देखील मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.




























































