
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने रणजी ट्रॉफीतून माघार घेत रणजीत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रणजी ट्रॉफीची सुरुवात 10 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी बडोदा संघाची घोषणा झाली असून केदार देवधरकडे कर्णधारपद आणि विष्णू सोलंकीकडे उपकर्णधापद देण्यात आले आहे. आयपीएलसाठी देशांतर्गत प्रथमश्रेणी क्रिकेटमधून माघार घेण्याच्या पांड्याच्या निर्णयामुळे क्रिकेट रसिक त्याच्यावर नाराज आहेत.
आयपीएल 2022 साठी अहमदाबाद संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या जोरदार तयारी करत आहे. मात्र, आयपीएलसाठी उपलब्ध असलेल्या हार्दिकने रणजी स्पर्धेतून माघार घेतली आहे. हार्दिक गेल्या काही महिन्यांपासून दुखपतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. तो गेल्या वर्षी टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर हार्दिकने दुखापतीचे कारण देत निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. हार्दिकला दुखापत झाली होती आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त होत नाही तोपर्यंत त्याला ब्रेक देण्यात आलाय, असे काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले होते. तसेच तो रणजी ट्रॉफीत खेळताना दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
हार्दिक पांड्या 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपपासून दुखापतीला तोंड देत होता. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रियाही झाली होती. त्यामुळे तो तंदुरुस्त नव्हता. आयपीएलच्या गेल्या हंगामात त्याने गोलंदाजी केली नव्हती. टी-20 विश्वचषकातही सुरुवातीच्या सामन्यात तो गोलंदाजी करू शकला नाही. यामुळे हार्दिकने संघातील स्थान गमावले आणि नंतर मुंबई इंडियन्सनेही त्याला रिटेन केले नाही. आता आयपीएल 2022 मध्ये हार्दिक खेळताना दिसणार आहे. पांड्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केले नाही. आता अहमदाबाद संघाने त्याला 15 कोटींना विकत घेतले आहे.
अहमदाबाद संघाचे नामकरण ‘ अहमदाबाद टायटन्स’
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 15 व्या हंगामात 10 संघ खेळणार आहेत. मागील काही हंगामात 8 संघ या स्पर्धेत भाग घेत होते. पण आता आणखी दोन संघ या लीगला जोडले गेले आहेत. त्यापैकी एक संघ लखनौचा, तर दुसरा संघ अहमदाबादचा आहे. काही दिवसांपूर्वी लखनौच्या आयपीएल संघाचे अधिकृत नाव आणि लोगो जाहीर करण्यात आला. आता अहमदाबादच्या आयपीएल संघाचे नावही समोर आले आहे. अहमदाबादच्या आयपीएल फ्रँचायझीच्या मालकांनी या संघाचे नाव ‘अहमदाबाद टायटन्स’ ठेवले आहे.



























































