12 मुलं जन्माला घालायची आहेत, क्रिकेट टीम बनवायचीय म्हणत तरुणाने केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणातील हिसारमधील आदमपूरच्या चुलीबडियान गावात राहणाऱ्या एका तरुणाने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम हिसार जनरल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. पोलिसांना 11 पानी सुसाईड नोट सापडली असून हा तरुण एकतर्फी प्रेमामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता असा पोलिसांना संशय आहे.

हिसार बसस्थानक पोलीस चौकीमध्ये सदर प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. इथल्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव हर्ष असं होतं आणि तो एमआर म्हणून काम करत होता. सोमवारी त्याने स्टँडसमोर असलेल्या या हॉटेलमधील खोली बुक केली. हर्षने रात्री जेवणाची ऑर्डरही दिली नव्हती.

मंगळवारी सकाळी 10 वाजता हर्षच्या खोलीतील फोनवर कर्मचाऱ्यांनी फोन केला, मात्र हर्षने फोन उचलला नाही. सकाळी चेकआऊट सुरू असताना हर्षच्या खोलीपाशी गेले असता त्यांना त्याची खोली आतून बंद असल्याचं दिसलं. दरवाजा ठोठावूनही दार न उघडल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला.

आतमध्ये जाताच पोलिसांना हर्षने गळफास घेतल्याचं दिसलं. हर्षने मृत्यूपूर्वी 11 पानांची सुसाईड नोट लिहिली होती. यात त्याने लिहिले होते की, “माझ्या आयुष्याचा प्रवास इथपर्यंतछ होता. माझं स्वप्न होतं की मला 12 मुलं होतील, मी एक क्रिकेट टीम बनवेन , मात्र ते स्वप्न अपूर्ण राहिले. काही हरकत नाही “बाबू’, नशिबाची गोष्ट आहे, पुढच्या आयुष्यात स्वप्न साकार होईल… बाबू, तुझ्यासोबत घालवलेले क्षण सर्वात चांगले होते आणि आता मी माझा जीव देत आहे आणि तू एक चांगला मुलगा बघून लग्न कर.”

हर्षने पुढे लिहिलंय की “भाऊ, मी सर्व जबाबदाऱ्या तुझ्या खांद्यावर टाकून जात आहे. मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. मला क्रिकेट संघ बनवायचा होता. मी माझ्या भावासारखा होऊ शकलो नाही, माफ करा. मी हे पाऊल उचलत आहे.. मी डिप्रेशनमध्ये आहे, ज्यामुळे मी एक चांगला भाऊ, मुलगा आणि प्रियकर बनू शकलो नाही. आई आणि बाबा मी तुमच्यावर प्रेम करतो. माफ करा मित्रांनो, मी सगळ्यांना सोडून जात आहे. “