अयोध्या दौऱ्यावरून टीका करणाऱ्या डॉक्टरला दीपक सावंत यांचे सडेतोड उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून पोटशूळ उठलेल्यांकडून याचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. राममंदिरापेक्षा आरोग्यमंदिरे उभारण्याचा अनाहूत सल्ला देणाऱया टीकाकारांना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सडेतोड उत्तर दिले. नागरिकांचे आरोग्य जपणे हाच शिवसेनेचा वसा असून बाईक अॅम्ब्युलन्स असो, टेलिमेडिसीन असो किंवा शिवआरोग्य सेवा यासारख्या उपक्रमांतून हा वसा जपण्यात आला. अयोध्या दौऱयावर टीका करणाऱया या लेखकाला आपल्या लहानपणापासूनच राममंदिर हे शिवसेनेच्या अजेंडय़ावर असल्याचे स्पष्ट उत्तर आरोग्यमंत्र्यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिले.

शिवसेनेच्या ‘चलो अयोध्या’ दौऱयाने भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळाले. यातून काही लोकांनी अनाहूत सल्ला देण्याचाही प्रयत्न केला. अशा प्रकारचा लेख लिहिणाऱया डॉ. अमोल अन्नदाते यांना चोख उत्तर दिले. आरोग्य खात्याचा अभ्यास लेखकाने करणे आवश्यक असल्याचे सांगत डॉक्टरांच्या भासणाऱ्या कमतरतेवर तोडगा काढण्यासाठी सी. पी. एस.सारखा कोर्स तयार करण्यात आला. यातून बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ डॉक्टर्स आरोग्य खात्याला मिळाले. ग्रामीण भागातील, आदिवासी पाडय़ांतील आरोग्यसेवा सुधारावी म्हणून शिवसेनेच्याच संकल्पनेतून वॉमर, रिस्युटेशन किटस्, नेब्युलायझर दिले, औषधे दिली. यामुळे आदिवासी भागातील बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाले. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतूनच मेळघाट, मोखाडा, वाडा यासारख्या आदिवासी भागांत रिअल टाइम टेलिमेडिसीनच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. केंद्रीय मंत्र्यांनीही दिल्लीत बसून मेळघाटमधील पेशंटवर या माध्यमातून कसे उपचार होतात हे अनुभवले आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, केमोथेरपी यासारख्या सुविधाही जिल्हा पातळीवर सुरू करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

स्वाइन फ्लूसाठी एन 95 मास्क
2010 साली स्वाइन फ्लू आला तेव्हा त्यावेळच्या सरकारला शक्य नसलेले एन 95 मास्क अर्जेंटिनाहून मागवून डॉक्टरांना देण्यात आले. स्वाइन फ्लू रुग्णांसाठी व्हेंटिलेटर प्रोटोकॉल आरोग्यमंत्री म्हणून आपण पुढाकार घेऊन केल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. लेप्टोसारखा आजार होऊ नये म्हणून 200 हून अधिक ठिकाणी डॉक्सीसिलीन वाटप करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

बालमृत्यू दर प्रयत्नांमुळेच घटला
आारोग्य खात्याने आदिवासी भागात केलेल्या सामाजिक जागृती, ऑण्टिबायोटिक प्रोटोकॉल, न्यूओनॅटल प्रोटोकॉल तयार करून तज्ञांचा सल्ला घेऊन केलेल्या परिश्रमांमुळेच मातामृत्यू दर, अर्भक मृत्यू दर, बालमृत्यू दर घटला.