मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, दोन दिवसांत मान्सूनची एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात मान्सून दाखल झाल्याची वर्दी मिळालेली असतानाच आज सायंकाळी मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर आकाशात ढग दाटून आलेले असल्याने हवामान खात्याप्रमाणे प्रत्येकजण आज नक्की पाऊस येणार असा अंदाज वर्तवत होता. त्यानुसार सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कामावरून, ऑफिसमधून घरी परतणाऱया मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली. कुणी छत्री घेण्यासाठी तर कुणी रेनकोटच्या खरेदीसाठी दुकानांबाहेर गर्दी केली होती.

चढलेल्या तापमानाचा पारा आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे गेल्या चार महिन्यांपासून मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. त्यामुळे सगळ्यांचेच पावसाच्या अगमनाकडे डोळे लागले होते. गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्यानंतर आज मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह उपनगरात अनेक भागांत पावसाचा जोरदार शिडकावा झाला. त्यामुळे अनेकांची धावपळ झाली. रस्त्यावर अनेक ठिकाणी दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या. तरीही उकाडय़ामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांनी या पावसाचे जोरदार स्वागत केले.

चाळींच्या छपरावर शाकारणी 

मान्सूनपूर्व सरींनी गुरुवारी मुंबईत हजेरी लावल्याने आज प्रत्येकजण पावसाळापूर्व शाकारणीच्या तयारीला लागले होते. आपल्या घराच्या पत्र्यातून पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून अनेकजण दिवसभर मोठे प्लॅस्टिक कागद, ताडपत्री छतावर टाकण्याच्या कामात व्यस्त होते. तर काही ठिकाणी तुटलेले सिमेंटचे पत्रे बदलण्याचे काम सुरू होते.