कोल्हापुरात संततधार पावसाचा जोर कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिह्यात आज तब्बल सहाव्या दिवशीही संततधार पावसाचा धुमाकूळ सुरूच राहिला. आज सूर्यनारायणाचे दर्शन होईल, अशी आशेची किरणे निर्माण झाली असतानाच, पुन्हा पावसाला सुरुवात झाली. नद्या-नाल्यांना पूर आला असला, तरी राधानगरी धरणातून होणारा अत्यल्प विसर्ग, तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणातून अजूनही सव्वा लाखाहून अधिक विसर्ग सुरू असल्याने सध्यातरी त्याचा चांगला परिणाम येथील पूरनियंत्रणावर दिसून येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास महापुराची टांगती तलवार कायम राहिली आहे.

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 31.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत दोन ते तीन इंचांची वाढ झाली होती. तर, 18 पूल व 64 बंधारे पाण्याखाली गेल्याने पाच राज्यमार्ग व 12 प्रमुख जिल्हामार्ग असे एकूण 17 मार्ग अजूनही बंद आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास पंचगंगेची पातळी 37.11 फुटांवर आली होती. कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी 39 फुटांची इशारापातळी गाठण्याची शक्यता असून, नदीची धोकापातळी 43 फूट आहे. पूरबाधित क्षेत्रातील नागरिक सुरक्षितस्थळी स्थलांतरित होत आहेत. काही रुग्णालयांतील रुग्णांचेही स्थलांतर करण्याच्या हालचाली दिसून येत होत्या.

प्रमुख धरणांमध्ये 65 ते 80 टक्के पाणीसाठा

चार-पाच दिवसांपूर्वीच घटप्रभा, कोदे, जांबरे हे दीड टीएमसी क्षमतेचे धरण प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर, राधानगरीसह प्रमुख धरणे 65 ते 80 टक्के भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांतील पाणीसाठा 10 ते 15 टक्के अधिक आहे. काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 77.1 मि.मी. पावसाची नोंद झाली.

पूरस्थितीत जिल्हा परिषदेचे बारकाईने नियोजन

मागील महापुराचा अनुभव पाहाता, यंदा पूरबाधित नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असून, यासाठी बारकाईने नियोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. पूरकालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुरेशा व स्वच्छ पाणीपुरवठय़ासह पुरामुळे स्थलांतरित कॅम्पमधील ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी 267 फिरती वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये एक हजार 35 कर्मचारी आरोग्य विभागासाठी नेमण्यात आली आहेत.