
कोयना धरणांतर्गत विभागात संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात अपेक्षित वाढ सुरू आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 38 हजार 188 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मागील चोवीस तासांत 3.26 टीएमसी पाण्याची आवक झाली असून, पाणी उंचीत 6 फूट 4 इंचांनी वाढ झाली आहे. धरणात सध्या एकूण 29.53 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी सर्वच ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी सायंकाळी 5 ते रविवारी सायंकाळी 5 पर्यंत या 24 तासांतील व 1 जूनपासून आत्तापर्यंतचा एकूण पाऊस कंसात पुढीलप्रमाणे- कोयना 127 (1161) मिलिमीटर, नवजा 156 (1522) मिलिमीटर व महाबळेश्वर 96 (1441) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील कसणी गावालगत असलेल्या पुलावरील भराव वाहून गेल्याने रविवारी त्याठिकाणी पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांनी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी दळणवळण गैरसोय व पर्यायी उपाययोजनांबाबत संबंधित विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना सुनील गाढे यांनी दिल्या.





























































