
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल ११ दिवसांनंतर पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. रात्री पावसाने शहरवासीयांची चांगलीच धांदल उडाली. खरेदीसाठी शेकडो कुटुंबे बाजारपेठेत असल्याने त्यांना या अचानक आलेल्या पावसात भिजावे लागले.
जून महिन्याच्या प्रारंभी अवकाळी पावसाने मान्सूनची वर्दी दिली होती. त्यामुळे ७ जूनपासून पावसाला प्रारंभ होणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्षात मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतरही मान्सून शहराकडे वळला नाही. आठवडाभरापासुन दिवसभर सोसाट्याचा वारा आणि ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. दरम्यान, दोन – तीन दिवसांपूर्वी हा वाऱ्याचा खेळ थांबला होता. त्यामुळे दिवसभर चटके देणारे ऊन आणि उकाडा असे वातावरण होते. त्यामुळे पाऊस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सोमवारी सकाळपासून आकाश निरभ्र आणि ऊन असे वातावरण होते. दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्याने उन्हाळ्यासारखे वातावरण अनुभवायला मिळाले. सायंकाळी नेहमीप्रमाणे वातावरण सामान्य होते. मात्र, पावणेसातच्या सुमारास काळ्या ढगांनी भरून आलेल्या आभाळातून जोरदार पावसाला सुरुवात झाली. शाळा सुरू झाल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी शेकडो कुटुंबे बाजारपेठेत आलेली होती. टपोऱ्या थेंबासह जोरदार आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत धांदल उडाली. आडोसा शोधेपर्यंत अनेकजण भिजले गेले. आता हा पाऊस शहराला झोडपून काढणार, असे वाटत असताना अर्धा तासातच पावसाचा जोर ओसरला आणि पाऊस थांबला.
शहरातील अनेक भागांत आलेला हा पाऊस मात्र हडको-सिडकोवर मेहरबान झाला नाही. सुरुवातीला दिल्ली गेटपर्यंत हा पाऊस दिसून आला. हिमायतबाग, हर्सूल टी पॉइंट, हडको भाग मात्र कोरडाच होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास या भागात रिमझिम पावसाने काही मिनिटे हजेरी लावली.































































