
खेड तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने धुमशान घातले आहे. आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दुपारनंतर पावसाने अचानक बसरायला सुरुवात केल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. जोरदार पाऊस, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यामुळे महामार्गावरील वाहतूकही मंदावली होती.
गेले काही दिवस परतीच्या पावसाने उच्छाद मांडला असून दुपारनंतर ढगांचा गडगडाट होऊन मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे. शेतात उगवलेल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत होता, मात्र दुपारनंतर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या या प्रयत्नावर पाणी फेरले जात आहे.
गेली काही वर्षे कोकणातील शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे कोकणातही शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शेती करण्यावर जेवढा खर्च होतो तेवढा खर्चदेखील शेतीच्या उत्पन्नातून निघत नाही. त्यामुळे वडिलोपार्जित शेती का करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे.
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतीची कामे वेळेत उरकली होती. त्यामुळे किमान शेतीचे पीक समाधानकारक होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.



























































