पारनेर आणि श्रीगोंद्यासह नगर तालुक्यात जोरदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर व श्रीगोंदा तालुक्यासह नगर तालुक्यातील काही भागांत बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. अन्य ठिकाणी मात्र तुरळक स्वरूपात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात एकूण 9.3 मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे.

बुधवारी सायंकाळी सातच्या दरम्यान आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले होते. वीजेच्या कडकडाटासह जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. सर्वाधिक पाऊस पारनेर तालुक्यात झाला असून त्याची नोंद 44.3 मिमी इतकी झाली आहे. त्याखालोखाल श्रीगोंदा तालुक्यात 20 मिमी पाऊस पडला. नगर तालुक्यात 12.4 इतका पाऊस झाला असून जामखेड व संगमनेरलाही जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर शहरात मात्र पावसाने पाठ फिरविली. पारनेर तालुक्यातील पारनेर (43.8), भाळवणी (62), सुपा (62.5) वाडेगव्हाण (55.8) वडझिरे (27.8), निघोज (53.5), टाकळी (35.3), पळशी (13.5) या महसूल मंडळात धुव्वाधार पाऊस झाला.

श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण, काष्टी, श्रीगोंदा, देवदैठण, काळेगाव, चिंभळा या परिसरला जोरदार पावसाने झोडपले. नगर तालुक्यातील चास व केडगाव महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला.केडगाव महसूल मंडळात 49.5 मिमी एवढा पाऊस झाला. भिंगार परिसरात 10.8 मिमी पावसाची नोंद झाली. चासला 45.3, रुईछत्तीशी 10.5, वाळकी 10.5, चिचोंडी पाटील भागात 7.5 मिमी पाऊस पडला. संगमनेर व जामखेडलाही सरासरी 14 मिमी पावसाने हजेरी लावली. रात्रीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून हा पाऊस खरीप हंगामातील पेरण्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मिमीमध्ये अशी- नगर 12.4, पारनेर 44.3, श्रीगोंदा 20, कर्जत 2.8, जामखेड 14.4, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी 0, संगमनेर 14.5, अकोला 0, कोपरगाव 1.3, श्रीरामपूर 0, राहाता 2.5.