साताऱ्यात पुन्हा पावसाचा जोर, कोयना धरणात 48 टीएमसी पाणीसाठा

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा चोवीस तासांत जवळपास साडेचार टीएमसीने वाढला असून, सध्या धरणामध्ये 48.51 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, महाबळेश्वर व पाटण तालुक्यांत रस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. दरडी हटविल्याने या रस्त्यांवरील वाहतूक आता सुरू झाली आहे.

जिल्ह्यात काल कमी झालेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. महाबळेश्वर, पाटणसह सातारा, कराड, जावली तालुक्यांत पावसाचा जोर वाढला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरडप्रवण गावांमधील नागरिकांमध्ये संततधार पावसामुळे भीतीचे वातावरण आहे. तेथील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंत्रणा उभारली असून, त्यासाठी अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे.

जोरदार पावसामुळे आज (रविवारी) दुपारी पाटण तालुक्यातील भोसगाव- अमृळकरवाडी रस्त्यावर दोन ठिकाणी, निगडे – चव्हाणवाडी रस्त्यावर वाझोली गावाजवळ तीन ठिकाणी, महाबळेश्वर तालुक्यात भिलार-उंबरी-घावली रस्त्यावर दोन ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने तत्काळ दरड हटवून त्या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू केली.

दरम्यान, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पाऊस सुरू आहे. धरणात प्रतिसेकंद 50 हजार 578 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, पाणीसाठा चोवीस तासांत 4.37 टीएमसीने वाढून 48.51 टीएमसी झाला आहे.