अतिवृष्टीत कोकण रेल्वेचा वेग प्रति तास 40 कि.मी.पर्यंत मंदावणार; विद्युतीकरण तांत्रिक कारणाने बारगळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण रेल्वेवर मान्सून वेळापत्रक लागू झाले असून 10 जूनपासून कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. हे बदललेले मान्सूनचे वेळापत्रक 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. तसेच यंदा प्रथमच हा मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर पहिलाच पावसाळा असल्याने कोकण रेल्वेने त्यादृष्टीने तयार पूर्ण केली असून अतिवृष्टी झाल्यानंतर ड्रायव्हरची दृश्यमानता घटल्यास ट्रेन प्रति तास 40 कि.मी.वेगाने गाड्या चालविण्याचे आदेश कोकण रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.

रोहा ते ठोकूर असा कोकण रेल्वेचा 740 कि.मी.चा मार्गावर पावसाळ्यापूर्वीची काम बोल्डर हटविणे, झाडांच्या फांद्या छाटणे, झरे साफ करणे अशी कामे पूर्ण झाली आहेत. दर 1 किलोमीटर मागे तब्बल रेल्वेचा स्टाफ निगराणी करणार असून तब्बल 846 पेट्रोलमन आणि संवेदनशील जागी 24 तास पहारा करणारे ‘स्टेशनरी वॉचमन’ नियुक्त करण्यात आली आहे. ड्रायव्हर आणि गार्डकडे संपर्कासाठी वॉकी टॉकी यंत्रणा पुरविण्यात आली आहे. तसेच आपात्कालिन स्थितीत ट्रेन क्रुशी संपर्क साधण्यासाठी स्टेशनमास्तरांकडे 25 वॅटवर चालणारे विशेष वायरलेस नेटवर्कची ‘व्हीएचएफ’ यंत्रणा पुरविण्यात आली आहे.

सब स्टेशनमधून धूर आला
कोकण रेल्वेचा महत्वाकांक्षी विद्युतीकरण प्रकल्प यंदा मार्च महिन्यात पूर्ण करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. 24 मार्च रोजी रत्नागिरी ते थिवीम मार्गावर शेवटचे ‘इन्स्पेक्शन’ पूर्ण होऊन संपूर्ण मार्ग वीजेचा झाल्याचे जाहीर करण्यात आले. विद्युतीकरणाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला या मार्गावरून 1 मे महाराष्ट्र दिनापासून पहिल्या टप्प्यात दहा प्रमुख ट्रेन विद्युत इंजिनावर धावण्यास प्रारंभ होणार होता. परंतू सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.

कोकणात गाड्या संपूर्णपणे वीजेवर अजूनही धावत नाहीत. रत्नागिरीनंतर डिझेल इंजिनने गाडी धावत असते, असे या मार्गावरचे नेहमीचे प्रवासी बळीराम राणे यांनी सांगितले.

मान्सूनमध्ये प्रति तास वेगावर नियंत्रण
रोहा ते वीर मार्गादरम्यान – 110 कि.मी.
वीर ते कणकवली – 75 कि.मी.
कणकवली ते उडुपी – 90 कि.मी.
उडुपी ते ठोकूर – 110 कि.मी.