अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून, मैंदर्गीतील खुनाचा उलगडा; प्रियकराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी परिसरात एका युवकाचा खून करून अर्धवट अवस्थेत जळालेल्या घटनेचा 24 तासांत उलगडा झाला असून, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

चंदप्पा धर्माण्णा कांबळे (रा. आंबेवाड, आळंद) असे खून झालेल्याचे नाव असून, सूर्यकांत शरणप्पा कांबळे (रा. देवंती, ता. आळंद) याला अटक करण्यात आली आहे, असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. सूर्यकांत कांबळे याचे चंदप्पा कांबळे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या संबंधात चंदप्पा अडसर ठरत असल्याने ट्रकचालक असलेला आरोपी सूर्यकांत कांबळे हा चंदप्पाला गावाकडे जाण्यासाठी म्हणून यवत, इंदापूर, सोलापूर व अक्कलकोटमार्गे मैंदर्गीला घेऊन आला होता. वाटेत दारू पाजून खून केल्यानंतर चंदप्पाचा मृतदेह मैंदर्गीजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत टाकून पेटवून दिला. यात चंदप्पाचा मृतदेह अर्धवट जळालेला होता. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तपासाची चक्रे फिरली व अवघ्या 24 तासांत सूर्यकांत कांबळे याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव, अक्कलकोट विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश स्वामी, उपनिरीक्षक सिद्राम धायगुडे, हवालदार अजय भोसले, सुरेश जाधव, पोलीस नाईक नबीलाल नियोंवाले, जगदीश राठोड, सुभाष दासरे, हरिदास सलगर, सिकंदर मुल्ला, विजय कोरे, श्रीकांत जवळगे यांनी केली आहे.