मॉकड्रीलमध्ये अल्लाहू अकबरच्या घोषणा, उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - प्रातिनिधीक

दहशतवादी हल्ल्याचं मॉक ड्रील सुरू असताना दहशतवादी झालेल्या पोलिसांनी अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्याचा प्रकार चंद्रपूर आणि नगर जिल्ह्यात उघडकीला आला होता. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणावर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून त्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सय्यद उस्मा अब्दुल कादिर या सामाजिक कार्यकर्त्याने याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेत राज्यातील अनेक ठिकाणी होणाऱ्या अशा मॉक ड्रीलसंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्याची विनंती करण्यात आली आहे. या याचिकेवर 3 फेब्रुवारी रोजी न्या. मंगेश पाटील आणि न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

या सुनावणीत या याचिकेच्या मुद्द्यांवरून युक्तिवाद करण्यात आला. त्यानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी नगर जिल्ह्यातील मालीवाडा बस स्थानकावर पोलिसांनी मॉक ड्रील घेतलं. या मॉक ड्रीलमध्ये जे पोलीस दहशतवादी झाले होते, त्यांनी मुस्लीम समुदायातील पुरुषांचा पोशाख केला होता.

तसंच, या दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांनी नारा ए तखबीर आणि अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या. साधारण अशीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातील महाकाली येथे 11 जानेवारी रोजी घडली होती. कादिर यांनी सदर वेशभूषा आणि सादरीकरणावर आक्षेप घेतला. या प्रकरणावर कादिर यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने अशा प्रकारच्या मॉक ड्रीलसंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत का, याची विचारणा करत सुनावणी तहकूब केली.