रस्त्यावरील अतिक्रमण महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे हायकोर्टाने फटकारले; तुम्हीच तोडगा काढायला हवा

सार्वजनिक रस्त्यावर महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे अतिक्रमण होते. ही समस्या पालिकेने तयार व सहन केलेली आहे. पालिकेनेच या समस्येवर तोडगा काढायला हवा, असे खडेबोल उच्च न्यायालयाने सुनावले. यावरील पुढील सुनावणी 4 जुलै 2024 रोजी होणार आहे.

भावना पुंज कॉ. हॉ. सोसायटीने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्या. एम. एस. सोनक व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने पालिकेवर चांगलेच ताशेरे ओढले. सोसायटीचे बांधकाम 2018 मध्ये पूर्ण झाले आहे. अजून त्यांना ओसी मिळालेली नाही. अग्नि सुरक्षा विभागाने त्यांना एनओसी नाकारली आहे. सोसायटीच्या रस्त्यावर अतिक्रमण असल्याचे अग्नि सुरक्षा विभागाचे म्हणणे आहे. त्यावर न्यायालय संतप्त झाले. अग्नि सुरक्षा विभाग पालिकेचाच आहे. अतिक्रमण हटवणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यांनी ते हटवायला हवे. ओसी मिळायला उशील झाला यासाठी सोसायटी जबाबदार नाही. याकरिता पालिकाच जबाबदार आहे, असे खंडपीठाने कान उपटले.