
काळ बदलला आहे. भाऊ-बहीण आणि आई-मुलगा यांच्यातील नात्यात संस्कार शिल्लक राहिलेले नाहीत. संस्काराची मर्यादा ओलांडल्याची अनेक उदाहरणे आहेत, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कायद्यातील तरतुदींवर भाष्य केले. कायद्याने आमचे हात बांधलेत, अशी हतबलता न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पित्याचे दोषत्व रद्द करताना न्यायालयाने महत्त्वपूर्ण मते नोंदवली. पीडित मुलीने फौजदारी दंड संहितेच्या कलम 164 अन्वये महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात जबाब नोंदवला होता. मात्र कनिष्ठ न्यायालयातील जबाबात तिने तिच्यावर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराला दुजोरा दिला नाही.
त्यामुळे सध्याच्या कायद्यातील तरतुदींच्या आधारे न्यायालयाने आरोपी पित्याला बलात्काराच्या आरोपातून दोषमुक्त केले. न्यायमूर्ती प्रसन्ना वारळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. नाशिकच्या 39 वर्षीय आरोपीला पोक्सो न्यायालयाने जुलै 2015 मध्ये दोषी ठरवले होते.




























































