
देशात गेल्या काही दिवसांपासून हिजाब घालण्यावरून मोठा वाद सुरू आहे. यावरून अनेक राजकीय तसेच इतर देशांमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीही यावरून निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आमच्या अंतर्गत मुद्दय़ांवर हेतुपुरस्कर विधाने सहन केली जाणार नाहीत, अशा शब्दांत हिजाब वादावरून टीका करणाऱ्या देशांना ठणकावले आहे.
हिजाब वादावरून टीका करणाऱ्या देशांसाठी हिंदुस्थानने निवेदन जारी केले आहे. कर्नाटकमधील काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या ड्रेसकोडविषयीचा वाद सुरू असून त्याची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयात सुरू आहे. हा मुद्दा आमची घटनात्मक चौकट, कार्यपद्धती, लोकशाही मूल्य, धोरणे यासंदर्भात तपासला जात आहे आणि सोडवला जात आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भातील माहिती देताना म्हटले आहे.
‘जे हिंदुस्थानला व्यवस्थित ओळखतात ते ही सर्व वास्तव परिस्थिती समजून घेतील. पण आमच्या अंतर्गत मुद्दय़ांवर हेतुपुरस्सर करण्यात येणारी विधाने सहन केली जाणार नाहीत’, असे बागची यांनी हिजाब वादावरून टीका करणाऱ्या देशांना ठणकावले आहे.
हिजाब प्रकरणात अमेरिकेची उडी
धार्मिक पोशाखांच्या परवानगीबाबत कर्नाटकने ठरवू नये, असे सांगत कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवरून निर्माण झालेल्या वादात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. धार्मिक स्वातंत्र्यामध्ये लोकांना त्यांचे धार्मिक कपडे निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हिंदुस्थानातील धार्मिक पोशाखांना परवानगी द्यायची की नाही हे कर्नाटक राज्याने ठरवू नये. शाळांमधील हिजाबवरील बंदी धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करत असून महिला, मुलींकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असे अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य विभागाचे राजदूत रशाद हुसैन यांनी ट्विट करत म्हटले आहे.
देशात अराजकता पसरवण्याचा कट; आयबीकडून अलर्ट जारी
हिजाबच्या वादावर देशातील अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय खलिस्तानी दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून हिजाबच्या मुद्दय़ावरून हिंदुस्थानात अराजकता पसरवण्याचा कट रचला जात आहे. देशात हिजाब सार्वमतासाठी एक वेबसाईटही तयार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्याकडून व्हिडीओही जारी केला आहे. आयएसआयच्या या कटानंतर गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. याबाबत आयबीने अलर्टही जारी केला आहे.

























































