घरात रोख पैसे ठेवताय? मग हे नियम तुम्हाला माहीत असायला हवेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या देशात रोखीचे व्यवहार करण्यासाठी घरात रोख पैसे ठेवणं ही अतिशय सामान्य बाब समजली जाते. किंबहुना वर्षांनुवर्षं ही पद्धत सुरू राहिली आहे. बँक, पतपेढ्यांसारखे सुरक्षित आर्थिक व्यवहार आल्यानंतरही आजतागायत घरात रोख रक्कम ठेवण्याला प्राधान्य दिलं जातं. कारण, आणीबाणीच्या प्रसंगात त्याचा उपयोग होऊ शकतो. पण, घरात किती रक्कम ठेवावी याचे काही नियम आहेत.

घरात एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच रोख रक्कम ठेवता येते. त्या मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम आढळल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. अर्थात आपण घरात किती रोख ठेवतो, त्याबाबत कोणत्याही प्राधिकरणाला किंवा अधिकृत संस्थेला माहिती देणं अनिवार्य नसतं. पण, जर तुमच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त रोख असेल, तर त्याचे काही नियम ठरवण्यात आले आहेत.

सर्वप्रथम, जर ही रोख रक्कम करप्रणालीच्या कोणत्याही मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर त्या रकमेवरचा कर तुम्ही चुकवणं गरजेचं असतं. कारण, जर या रोख रकमेची तपासणी केली गेली, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. संबंधित रकमेवर लागू शकणारा कर तुम्ही चुकवला असेल, तर त्याचे दस्तऐवज तुम्ही अधिकाऱ्यांना सादर करू शकता.

तसंच, ही रोख रक्कम नेमकी कोणत्या मार्गाने तुम्हाला मिळाली आहे, तो स्रोत माहीत असणं आणि त्याचे पुरावे सादर करणंही बंधनकारक असतं. जर, ती रक्कम संपूर्णतः वैध मार्गाने मिळवलेली आणि कर भरलेला असेल तर त्या रकमेबाबत कोणत्याही कायदेशीर मार्गाने कारवाई करता येत नाही.

जर आयकर विभागाने या संबंधीची कागदपत्रं मागवली आणि ती तुम्हाला दाखवता आली नाही, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आयकर कायद्यानुसार, घरात सापडलेल्या रकमेच्या 137 टक्के दंड भरावा लागतो. म्हणजेच तुमच्याकडे सापडलेल्या एकूण रकमेवर आणखी 37 टक्के अधिक रक्कम दंड म्हणून भरावी लागू शकते.