
कोरोनाचा नवीन विषाणू घातक आहे, कोणतीही लक्षणे दिसत नसताना अनेकांना तो बाधित करत आहे. त्यामुळे कोरोना रोखणे हे राज्य शासनाचे मुख्य ध्येय आहे. प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेतली असून, विनाकारण फिरणाऱयांचा तातडीने बंदोबस्त करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱयांना दिल्या.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदी आदेशाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा गृहराज्यमंत्री देसाई यांनी घेतला. त्यांनी कोरेगाव, रहिमतपूर, मसूर भागातील बंदोबस्ताची पाहणी करून सूचना दिल्या. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. यावेळी आमदार महेश शिंदे, शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, प्रांताधिकारी ज्योती पाटील, उपविभागीय अधिकारी जयश्री पाटील, उत्तम दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, मुख्याधिकारी विजया घाडगे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजन काळोखे यांच्यासह अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्य़ांनी वाढती गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. संचारबंदीचा आजचा पहिला दिवस असल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱयांना सूचना द्या, उद्यापासून कठोर कारवाईला सुरुवात करा, अशी सूचना त्यांनी केली.
फलटणमध्ये पोलिसांचे संचलन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाच्या अनुषंगाने पोलीस, महसूल व नगरपालिका यांच्यातर्फे शहरात संचलन करून नागरिकांना संचारबंदी आदेशाच्या नियमांच्या अंमलबजावणीबाबत आवाहन करण्यात आले. महात्मा फुले चौक, डेक्कन चौक, महावीर स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रविवार पेठ, उमाजी नाईक चौक, गजानन चौक असे संचलन करण्यात आले. यावेळी इन्सिडेंट कमांडर डॉ. शिवाजी जगताप, पोलीस अधिकारी तानाजी बरडे व मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्यासह महसूल, पोलीस व नगरपालिका कर्मचारी संचलनात सहभागी झालेले होते.




























































