VIDEO- के.एल.राहुलने फलंदाजीत गमावले मात्र प्रामाणिकपणाने कमावले

सामना ऑनलाईन । सिडनी

हिंदुस्थानचा सलामीचा फलंदाज के.एल राहुल हा त्याच्या खराब फॉर्ममुळे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. मैदानावर बॅटने फारशी कमाल दाखवू न शकलेल्या राहुलने त्याच्या प्रामाणिकपणाने सर्वांची मनं जिंकली आहेत. मैदानावरील त्याचा प्रामाणिकपणा पाहून संघातील त्याच्या सहकाऱ्यांनी तर त्याचं कौतुक केलंच पण अंपायर इयान गोल्ड यांनी देखील टाळ्या वाजवून त्याला शाबासकी दिली.

हिंदुस्थान ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या चौथ्या व निर्णायक कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी उतरला होता. रविंद्र जाडेजाच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्कस हॅरिसने चेंडू टोलावला. यावेळी राहुलने धावत येऊन तो झेल घेतला. सर्व खेळाडू विकेट पडल्याच्या आनंदात असतानाच राहुलने मात्र चेंडू मैदानावर बाऊन्स झाल्यानंतर त्याने झेल घेतल्याचे सांगितले. राहुलने अशा प्रकारे तो झेल घेतला होता की त्याने सांगितल्याशिवाय अंपायरला तो झेल चुकीचा आहे हे समजलेच नसते. त्यामुळे राहुलच्या या प्रामाणिकपणाचे सर्वांनीच कौतुक केले. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.