रॅपर हनी सिंगविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल, अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध रॅपर हनी सिंग वादात सापडला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमाच्या आयोजकाने हनी सिंग आणि त्याच्या जवळच्या लोकांविरुद्ध अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विवेक रमन नावाच्या व्यक्तीने हनी सिंगविरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस स्थानकामध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. विवेक यांच्या म्हणण्यानुसार हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांनी आधी त्यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांना हॉटेलमध्ये बंदिस्त करून बेदम मारहाण केली. त्यामुळे विवेकने हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांच्या अटकेची मागणी करत FIR दाखल केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना विवेक यांनी सांगितले की, त्यांनी नुकताच फेस्टिव्हिना नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्यांनी हनी सिंगला परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र आर्थिक अडचण भासल्याने त्यांनी कार्यक्रम रद्द केला. हनी सिंगला ही गोष्ट आवडली नाही म्हणून त्याने आपल्या सहकाऱ्यांसह आयोजकाचे अपहरण केले. त्यानंतर मुंबईतील सहार येथील एका हॉटेलमध्ये बंदिस्त केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर हनी सिंगकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हनी सिंगवर यापूर्वी देखील असे अनेक आरोप झाले आहेत. त्याच्यावर गाण्यांमधून अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप झाला. त्यानंतर त्याची अगोदरची पत्नी शालिनी तलवार यांनी त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता आणि आता त्याच्यावर अपहरण आणि मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे.