
लखनऊच्या मोहन रोडवरील जयप्रकाश नारायण सर्वोदय विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शाळेतील कथित गैरव्यवस्थेविरोधात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. निकृष्ट दर्जाचे भोजन, आरोग्यसेवेतील हलगर्जीपणा आणि शिक्षकांची कमतरता या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी बुद्धेश्वर-मोहन मार्गावर चक्का जाम केल्याने परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार विद्यार्थ्यांच्या आरोपानुसार, वसतिगृहात मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा अत्यंत खराब आहे. जेवणामध्ये अनेकदा किडे आढळल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. याबाबत तक्रारी करूनही प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच आरोग्यसेवेबाबतही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. एखादा विद्यार्थी गंभीर आजारी पडला तरी योग्य उपचार न करता केवळ औषध देऊन प्रकरण मिटवले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्याचबरोबर विद्यालयात शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे समाजकल्याण मंत्री असीम अरुण आणि प्रमुख सचिव अनुराग यादव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या परिसरात नेण्यात आले. मंत्री असीम अरुण यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रश्न सोडवण्यासाठी एका आठवड्यात प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.




























































