
सामना प्रतिनिधी । नांदेड
लोहा शहरातील इंदिरानगर भागात संतप्त पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना सायंकाळी घडली. माळेगाव यात्रेला पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून पतीने संतापाने तिचा गळा दाबला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. लोहा पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदविला आहे.
लोहा शहरातील इंदिरानगर भागात राहणारा मजुर व्यंकटी तेलंग (37) हा कुटुंबियांसह राहतो. पत्नी अंजनाबाई (32) हिच्यासोबत पैशावरून त्याचे नेहमीच वाद होत असे. तिला मारहाणही करीत असे. यातच माळेगाव यात्रेला व अंडगा येथील एका नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी त्याने पत्नीला पैसे मागितले. परंतु तिने नकार दिल्याने अखेर संतापून त्याने अंजनाबाई हिचा गळा आवळून खून केला. ही माहिती तिच्या माहेरी समजताच नातेवाईकांनी लोहा गाठले. नामदेव अंबाजी पालमपल्ली (रा. माखणी ता, पूर्णा, परभणी) यांच्या फिर्यादीवरुन लोहा ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला. त्याच्याविरूध्द यापूर्वीही हाणामारीचा गुन्हा दाखल होता. पोलीस फौजदार कपील आगलावे यांनी मारेकरी पतीला रात्रीच अटक केली. त्याला आज लोहा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.



























































