
ऐरोलीत राहणाऱ्या सुनिता कुशवाहा (40) हिच्या अंगात जणू पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हिची हत्या करणारा अभय कुरुंदकरच संचारला. प्रेमाच्या आड येणारा पती बळीराम कुशवाहा याची सुनिताने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून ते नवी मुंबईतील गवळीदेव जंगलपट्टीत फेकले. गावाहून आलेल्या बळीरामच्या भावाने पोलिसांत तक्रार केली आणि तब्बल अकरा महिन्यांनंतर या थरारक मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी सुनिता कुशवाहा आणि तिचा प्रियकर राहुल प्रजापती याला अटक केली आहे.
बळीराम कुशवाहा हा ऐरोलीतील यादवनगर येथे पत्नी आणि दोन मुलांसह राहात होता. या काळात त्याची पत्नी सुनिता हिचे घणसोली येथे राहणारा रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी प्रेमसंबंध जुळले. या संबंधाची माहिती बळीरामला मिळाल्यानंतर त्याने सुनिताला कडाडून विरोध केला. त्यानंतर सुनिताने राहुलच्या मदतीने पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.
घर भाड्याने दिले
सुनिता यादवनगरमधील राहते घर भाड्याने देऊन मुलांसोबत राहुलकडे घणसोली येथे राहण्यास आली. आठ महिन्यांनंतर बळीरामचा भाऊ गावाहून आला. त्याने चौकशी केली तेव्हा भांडण झाल्यानंतर बळीराम घर सोडून गेल्याचे सुनिताने सांगितले. भावाला संशय आल्याने एप्रिल २०२६ मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात बळीराम बेपत्ता झाल्याची तक्रार केली.
हत्येचा पक्का प्लॅन
दोन मुलांना त्यांच्या मावशीकडे पाठवल्यानंतर ९ ऑगस्ट २०२५ रोजी बळीराम मध्यरात्री गाढ झोपेत असताना आरोपींनी त्याचा गळा आवळला आणि त्यानंतर धारदार चाकूने गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय असे तीन तुकडे गोण्यात आणि चादरीत गुंडाळले. त्यानंतर राहुलच्या रिक्षातून रात्री गवळीदेव परिसरातील किर्रर्र जंगलात नेऊन वेगवेगळ्या तीन ठिकाणी फेकून दिले.
सीडीआरमधून उलगडले हत्येचे गूढ
बळीराम बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. दरम्यान सुनिता आणि राहुल यांनी जुने मोबाईल आणि सिमकार्ड बदलून नवे मोबाईल वापरण्यास सुरुवात केली होती. मात्र जुन्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सच्या तपासात राहुलचा सातत्याने सुनिताशी संपर्क असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे सुनिता पोलीस चौकशीत पतीबाबत वेगवेगळी माहिती देत असल्याने संशय आणखी बळावला. अखेर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी केली. तेव्हा त्यांच्या जबाबातील विसंगती उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली.
अवशेष शोधण्याचे आव्हान
पोलिसांनी बळीरामच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र गुन्हा घडून तब्बल अकरा महिने उलटल्याने तसेच पावसाळा, वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे मृतदेहाचे अवशेष शोधणे मोठे आव्हान ठरले आहे.






























































