प्रामाणिक रिक्षावाला, 10 तोळे सोन्याने भरलेली बॅग केली परत

दोन वेळचे पोट भरण्यासाठी खूप काबाडकष्ट करणाऱया व्यक्तीला जर सोन्याचे घबाड मिळाले, तर तो काय करेल… मोह आवरणार नाही, असा हा प्रसंग आहे. हैदराबाद येथील एका रिक्षाचालकाला अशीच सोन्याने भरलेली बॅग सापडली. त्या प्रामाणिक रिक्षाचालकाने तत्काळ पोलिसांना कळवले आणि बॅग परत केली. सैय्यद झकीर असे या रिक्षावाल्याचे नाव आहे. त्याच्या रिक्षामध्ये एक जोडपे 10 तोळे सोने असलेली बॅग विसरले होते. त्या बॅगेत फोन नंबरही होता. सैय्यद झकीरने पोलिसांना जाऊन घटना सांगितली. त्यानंतर दागिने जोडप्याला परत केल्याची माहिती पोलीस अधिकारी के. श्रीनिवास यांनी दिली. पोलिसांनी प्रामाणिकपणाबद्दल रिक्षावाल्याचा सत्कार केला.