धर्मरक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या केली!

सामना ऑनलाईन । बंगळूरू

जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आरोपाखाली कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) परशुराम वाघमारे याला अटक केली आहे. एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम वाघमारेने गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली दिली असून धर्म रक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केली असल्याचा एक धक्कादायक खुलासा त्याने त्याच्या कबुलीजबाबातून केला आहे.

परशुराम वाघमारे याने ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळूरूच्या आरआर नगरयेथील गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरासमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. आपण कोणाला मारणार आहोत, हे तेव्हा वाघमारेला ठाऊक नव्हते. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी एका व्यक्तिची हत्या करायची असल्याचे वाघमारेला सांगण्यात आले होते. एटीएससमोर वाघमारेने दिलेल्या कबुली जबाबात म्हटले की, ‘मी कोणाला मारणार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. धर्मरक्षणासाठी एक खून करायचा आहे, असे २०१७मध्ये मला सांगितले गेले होते. मी तो खून करायला तयार झालो. त्या कोण होत्या हे मला माहिती नव्हते. पण त्यांनी मी मारायला नको होते असे मला आता वाटतेय.’

वाघमारेने एसआयटीला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, त्याला ३ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथे नेण्यात आले होते. बेळगावमध्ये त्याला बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ‘लंकेश यांची हत्या करण्यापूर्वी मला एका घरात नेण्यात आले होते. तिथून एका बाइकवरून एका माणसाने मला लांबूनच गौरी यांचे घर दाखवले. दुसऱ्या दिवशी मला दुसऱ्या खोलीमध्ये नेण्यात आले. तिथून पुन्हा आम्ही लंकेश यांच्या घरी गेलो. त्याच दिवशी मला गौरी लंकेश यांची हत्या करण्यास सांगण्यात आले होते. पण आम्ही पोहोचलो तेव्हा त्या घराच्या आत गेल्या होत्या. त्यानंतर पुन्हा ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ च्या सुमारास माझ्या हातात बंदूक देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर आम्ही लंकेश यांच्या घरी गेलो. आम्ही योग्यवेळी पोहोचलो होतो. लंकेश यांनी नुकतीच गाडी घराच्याबाहेर थांबवली होती. मी गोळ्या झाडल्या आणि तिथून पळ काढला. त्याच दिवशी मी बंगळुरू सोडले,’ अशी माहितीही त्याने दिल्याचे एटीएसचे म्हणणे आहे.

एटीएसच्या दाव्यानुसार बेंगळुरमध्ये वाघमारेसोबत तिन्ही वेळी तीन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. एका व्यक्तिने त्याला बेंगळुरुला आणले. दुसऱ्या व्यक्तिने त्याला लंकेश यांचे घर दाखवले. तर तिसरी हत्येच्या वेळी त्याच्यासोबतच होती. दरम्यान, या तिन्ही व्यक्तींशी माझा काहीही संबंध नसून मी त्यांना ओळखत नसल्याचे वाघमारेने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या