अनधिकृतरित्या वृक्षतोड केल्यास होणार शिक्षा, झाडे न तोडण्याचे महापालिकेकडून आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनधिकृतरित्या वृक्षतोड करणे, हा कायदेशीर गुन्हा असून अशा व्यक्तीवर दंडात्मक आणि शिक्षेची कारवाई केली जाते. त्यामुळे येत्या वटपौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर, वडाच्या झाडाच्या फांद्या अथवा झाड तोडू नये, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, 1975 च्या कलम 21 मधील तरतुदीनुसार वृक्ष प्राधीकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडल्यास हा कायदेशीर गुन्हा ठरतो. अनधिकृत वृक्षतोड करणाऱयावर 1 हजार ते 5 हजारापर्यंत दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. अनधिकृत वृक्षतोड हा कायदेशीर गुन्हा असून गुन्हेगाराला कैद होऊ शकते.

किरकोळ विक्रेत्यांकडून झाडांना धोका

प्रत्येक वर्षी ‘वटपौर्णिमा’ सणाच्या वेळी वडाच्या झाडाच्या फांद्या बाजारात विक्रीसाठी येतात. ‘वटपौर्णिमा’ सणाचे औचित्य साधून विक्रेते सार्वजनिक रस्त्यांच्या आजूबाजूची आणि खासगी आवारातील वडाचे झाड किंवा फांद्या तोडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा किरकोळ विक्रेत्यांकडून झाडांना धोका असतो. मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात झाडांच्या संवर्धनाची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबईकरांनीही अशा वृक्षतोडीला आळा घालून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.