भुजबळांच्या सांगण्यावरून एकही कुणबी नोंद रद्द कराल तर याद राखा! मनोज जरांगे यांचा मिंधे सरकारला सज्जड दम

येवल्याचे मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणावरून पोटशूळ उठला आहे. भुजबळांच्या सांगण्यावरून सरकारने एकही कुणबी नोंद रद्द केली तर याद राखा, विधानसभेच्या निवडणुकीत 288 जागा पाडल्या जातील, असा सज्जड दम मनोज जरांगे पाटील यांनी मिंधे सरकारला दिला. मराठा समाजाच्या संयमाचा कडेलोट होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

मनाजे जरांगे पाटील यांच्या उपस्थित धाराशिव येथे बुधवारी मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लाखोच्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला होता. आयुर्वेद कॉलेज परिसरातील अहिल्यादेवी होळकर चौकातून रॅलीचा प्रारंभ झाला. धारासुर मर्दिनी, ख्वाजा शमसोद्दीन दर्गा, काळामारुती चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला.

मराठा समाजा बांधवांसमोर बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. धनगर समाजाचा प्रवर्ग वेगळा आहे, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असा शब्द मी देतो. परंतु भुजबळांचे ऐकुण धनगर समाजाने स्वत:चे नुकसान करून घेऊ नये असे ते म्हणाले. देशात फक्त मराठा समाजाच्याच शासकीय नोंदी सापडल्या आहेत. ओबीसीमधील कोणत्याही जातीची सरकारी नोंद नसल्याचा दावाही यावेळी जरांगे यांनी केला.

शांतता रॅलीचे चोख नियोजन
मराठा समाजाच्या वतीने शांतता रॅलीचे चोख नियोजन करण्यात आले होते. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, चहा-नाश्त्याची सोय करण्यात आली होती. शहरात असलेल्या विविध महापुरुषांच्या पुतळ्याचा परिसर रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. रॅलीत महिलांची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. रॅलीत समाज बांधवांना सूचना करण्यासाठी मार्गावर अडीचशे भोंगे लावण्यात आले होते. सामाजिक उपक्रम म्हणून यावेळी रक्तदान शिबिरही ठेवण्यात आले होते.