नगरमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम पुन्हा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिनिधी । नगर 

गेल्या अनेक दिवसांपासून थंडावलेली अतिक्रमण विरोधी मोहीम आज पुन्हा सुरु होऊन जुन्या बसस्थानकाच्या लगत असलेली अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. आज सुरु झालेली ही मोहीम अशीच चालू राहणार की पुन्हा थंड होणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

या बाबत अधिक माहीती अशी कि मागील महीन्यात शहरातील अतिक्रमणाच्या मुद्यावरून आंदोलने व प्रतिआंदोलने झाल्यानंतर महसूल, पालिका, पोलीस व बांधकाम विभागाने अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत शहरातील काही अतिक्रमणे काढून टाकली. मात्र या कारवाईत काही अतिक्रमण धारकांनी न्यायालयाचा आधार घेत आपली अतिक्रमणे शाबूत ठेवल्याने या कारवाईत विस्थापित झालेल्या अतिक्रमण धारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या कारवाईच्या वेळी जुन्या बसस्थानकाच्या लगत  असलेली अतिक्रमणे काढण्याच्या मुद्यावरून थोडा वादंग निर्माण झाला होता. आम्ही थाटलेली दुकाने ही परिवहन विभागाच्या हद्दीत नसल्याचा दावा या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांनी केला होता तर ही जागा आमच्या मालकीची असल्याचा दावा आगार प्रमुखांनी केला होता.

या नंतर या जागेची मोजणी तातडीने करण्याचे आदेश भूमी अभिलेख कार्यालयाला तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिल्या नंतर परिवहन विभागाच्या जागेतच व्यावसायिकांनी दुकाने थाटली असल्याचे निष्पन्न झाल्या नंतर ४८ तासात ही अतिक्रमणे काढावीत असे तोंडी आदेश नामदेव पाटील यांनी दिल्या नंतर काही व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून टाकली होती तर काही जणांनी मात्र ही अतिक्रमणे तशीच ठेवली होती. पंधरा दिवसांपूर्वी बसस्थानका लगत राहिलेली अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती मात्र व्यावसायिकांनी विरोध केल्याने त्या वेळी ही मोहीम गुंडाळण्यात आली होती मात्र आज बांधकाम विभाग, महसूल व पोलीस प्रशासनाने ही  अतिक्रमणे काढून टाकण्यास सुरवात करताच सर्वच व्यावसायिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून टाकली.

या वेळी दोन व्यावसायिकांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्या नंतर ही मोहीम सुरळीत पार पडली. आज सुरु झालेली ही मोहीम अशीच चालू राहणार की पुन्हा थंड होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.