
अफगाणिस्तानचा कांदा हिंदुस्थानात
पेंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. अफगाणिस्तानचा लाल कांदा पाकिस्तानमार्गे हिंदुस्थानात दाखल होत आहे. हिंदुस्थानात कांद्याचे वाढलेले दर आणि अफगाणिस्तानात कांद्याचे घसरलेले दर यामुळे खासगी व्यापारी अफगाणिस्तानातून कांदा आणून या ठिकाणी चढय़ा भावाने विकत आहेत. दिल्लीच्या व्यापाऱयांनी पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानचा कांदा 28 ते 30 रुपये किलो या दराने आणला असून या ठिकाणी तोच कांदा 40 ते 50 रुपये किलो दराने विक्री करत आहेत. अफगाणिस्तानमधून 200 टन कांदा हिंदुस्थानात आणला आहे.
परदेशी पर्यटकांची कुतुबमिनारवर गर्दी
दिल्लीतील कुतुबमिनार पाहण्यासाठी परदेशी पर्यटकांची गर्दी उसळत असून कुतुबमिनार परदेशी पर्यटकांच्या पसंतीस उतरणारे देशातील दुसऱया क्रमांकाचे पर्यटनस्थळ ठरले आहे. पेंद्रीय पुरातत्व विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष 2023-24 मध्ये कुतुबमिनार पाहण्यासाठी 2.2 लाख परदेशी पर्यटकांनी गर्दी केली होती. 2022 च्या तुलनेत हे प्रमाण 90 टक्क्यांनी जास्त आहे. दुसरीकडे आग्रा येथील ताजमहल पाहण्यासाठी 2.18 लाख परदेशी पाहुणे आले होते. कुतुबमिनार पाहण्यासाठी देशांतर्गत पर्यटकांची संख्याही 73.1 टक्क्यांनी वाढली आहे.
गुजरात विद्यापीठ कॅम्पसमध्ये शिरला बिबटय़ा
गुजरात येथील जुनागडच्या ऑग्रिकल्चर विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग विभागातील बायो एनर्जी लॅबमध्ये बिबटय़ा घुसला. यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्व विद्यार्थी तत्काळ प्रयोगशाळेतून बाहेर पडले. विद्यार्थ्यांनी बिबटय़ाचे व्हिडीओसुद्धा शूट केले. वन विभागाला याची माहिती देण्यात आली. अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत बिबटय़ाला पकडून सुरक्षित बाहेर काढले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आसाममध्ये पुराचा कहर
आसाममध्ये पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. गोवळपाडा जिह्यात नदीत बोट बुडाल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नागांव आणि जोरहाट जिह्यात पुराच्या पाण्यात 2 जण बुडाले आहेत. राज्यात पुराची परिस्थिती थोडी सुधारली असली तरी 24 जिह्यांतील 12.33 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. तसेच 32 हजार 924 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
केंद्राला 6481 कोटी लाभांश
कॅनरा बँक आणि इंडियन बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांनी केंद्राला आर्थिक वर्ष 2023-24 साठी लाभांशापोटी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना 6,481 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. बँक ऑफ बडोदाने 2,514.22 कोटी रुपये, कॅनरा बँकेने 1,838.15 कोटी रुपये, तर चेन्नईतील इंडियन बँकेने 1,193.45 कोटी रुपयांचा धनादेश दिला. बँक ऑफ इंडियानेदेखील 935.44 कोटी रुपयांचा लाभांश दिला.
कमला हॅरिस योग्य उमेदवार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीपासूनच मला हॅरिस यांच्याबद्दल विश्वास होता. राष्ट्राध्यक्ष पदासाठी त्या योग्य आहेत. त्या देशाचे प्रतिनिधित्व उत्तम पार पडतील. कमला हॅरिस यांनी महिलांच्या स्वतंत्रतेचा मुद्दा अतिशय समर्थपणे हाताळला आहे. कोणत्याही मुद्दय़ावर भाष्य करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, असेही बायडन म्हणाले.