
सामना प्रतिनिधी । मुंबई
बोरिवलीतील पालिकेच्या वीर सावरकर उद्यानात बुधवारी मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना घडली. मधमाश्यांनी प्रचंड चावे घेतल्यामुळे अंगात विष भिनल्यामुळे पंकज शहा (५४) यांचा मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी करुणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बोरिवली पश्चिमेला एल. टी. रोडवर असणाऱ्या वीर सावरकर गार्डनमध्ये फिरायला गेलेल्यांवर विषारी मधमाश्यांनी हल्ला चढवला. विषारी माशांच्या डंखामुळे जखमी झालेल्या पंकज शहा (५४) यांचा शुक्रवारी मृत्यू झाला तर रामानुज दाड (३२) आणि मेरिस्टा रामोना रोंगविला (४६) हे दोघे जखमी झाले. जखमींना तत्काळ करुणा हॉस्पिलटमध्ये दाखल करण्यात आले व उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. बुधवारी झालेली ही घटना आज उघडकीस आल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती.
दरम्यान, हे गार्डन पालिकेचे असले तरी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संस्थेकडे ते देखभालीसाठी देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या गार्डनची पाहणी केली असता तिथे मधाचे पोळे असल्याचे आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने तत्काळ कारवाई करून हे पोळे आणि माश्या नष्ट केल्या आहेत.
पंकज मफतलाल शहा (५४) असे या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शहा हे बोरिवली येथील सोडावाला लेन येथील प्लिजंट पॅलेस या इमारतीत राहत होते. बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ते जवळच्याच पालिकेच्या वीर सावरकर गार्डनमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले. त्याचवेळी तेथील झाडावरील मधमाश्यांनी त्यांच्यासह या गार्डनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या काही जणांवर हल्ला चढवला. मधमाश्यांनी अनेक चावे घेतल्यामुळे शहा हे अक्षरशः बेशुद्ध पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
धोका टळलेला आहे
या दुर्घटनेतील माश्या या सामान्यपणे गांधीलमाशी किंवा मधमाशी म्हणून ओळखल्या जातात. या माश्या सहसा माणसावर हल्ला करीत नाहीत, परंतु त्यांच्या पोळय़ावर दगड मारल्यावरच त्या अशा प्रकारचा हल्ला करतात. त्यामुळे या दुर्घटनेत कोणीतरी हा पोळा डिस्टर्ब केला असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या मधमाश्यांना यलो बॅण्डेड वॅस्प असे शास्त्राज्ञ नाव आहे. या गार्डनमध्ये झाडाच्या बुंध्यामध्ये हे मधाचे पोळे होते ते आम्ही शोधून काढले आहे. त्यावर आम्ही फॉगिंग केले, ट्रीट केले व सगळय़ा माश्या मारून टाकल्या आहेत. बुंध्यावर सिमेंट लावून सगळे बंद करून टाकले आहेत. त्यामुळे पुन्हा इथे माश्यांची उत्पत्ती होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. -राजेंद्र नारिंग्रेकर, कीटकनाशक अधिकारी




























































