
सामना प्रतिनिधी । मेलबर्न
विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने तिसर्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील पकड आणखी घट्ट करीत विजयाच्या दिशेने दमदार कूच केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने तंगवल्यामुळे हिंदुस्थानला चौथ्या दिवशी विजय मिळविता आला नाही. मात्र कांगारूंचं आजचं मरण उद्यावर ढकललं एवढंच. कारण रविवारी दिवसभराचा खेळ शिल्लक असून ‘टीम इंडिया’ विजयापासून केवळ दोन विकेट दूर आहे. हिंदुस्थानकडून मिळालेल्या 399 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना ऑस्ट्रेलियाने 85 षटकांत 8 बाद 258 धावसंख्येपर्यंत मजल मारली. गोलंदाजीत कमाल करणार्या पॅट कमिन्सने फलंदाजीतही चमक दाखविताना नाबाद 61 धावांची खेळी केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नॅथन लायन 6 धावांवर कमिन्सला साथ देत होता.
गोलंदाजांचा टिच्चून मारा
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची निराशाजनक सुरुवात झाली. जसप्रीत बुमराहने दुसर्याच षटकात ऍरोन फिंचला (3) स्लीपमध्ये कोहलीकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. मग रवींद्र जाडेजाने दुसरा आघाडीवीर मार्कस हॅरीसला (13) अग्रवालकरवी झेलबाद करून कांगारूंना दुसरा धक्का दिला. त्यानंतर उस्मान ख्वाजा (33) व शॉन मार्श (44) यांनी काही वेळ किल्ला लढविला. मोहम्मद शमीने ख्वाजाला, तर बुमराहने मार्शला पायचीत बाद करून ही जोडी तंबूत पाठविली. जाडेजाने मिचेल मार्शला (10) कोहलीकडे
52 धावांत गमावले तीन फलंदाज
दरम्यान, हिंदुस्थानने तिसर्या दिवसाच्या 5 बाद 54 धावसंख्येवरून शनिवारी सकाळी पुढे खेळताना 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 52 धावांची भर घातली. शुक्रवारी मयांक अग्रवाल व रिषभ पंत यांनी सहाव्या विकेटसाठी 10 धावांची भागीदारी केली होती. शनिवारी या जोडीने आणखी 29 धावा जोडल्या. मयांकने नॅथन लायनला दोन षटकारही ठोकले. पॅट कमिन्सने मयांकचा 43 धावांवर त्रिफळा उडविला. त्याच्या जागेवर आलेला रवींद्र जाडेजा 5 धावांवर बाद झाला. त्याला कमिन्सने उस्मान ख्वाजाकरवी झेलबाद केले. पंतही (33) जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर हिंदुस्थानने 8 बाद 106 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 6 बाद केले.झेल देण्यात भाग पाडले, तर इशांत शर्माने एका भन्नाट चेंडूवर स्थिरावलेल्या ट्रविस हेडचे (34) दांडके वाकविले. रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर कर्णधार टीम पेनच्या बॅटची खालची कड चेंडूला चाटली अन् यष्टीमागे रिषभ पंतने अवघड झेल टिपून ऑस्ट्रेलियाची 7 बाद 176 अशी केविलवाणी स्थिती केली.
11 वर्षांनंतर परदेशात धाडस
‘टीम इंडिया’ने तब्बल 11 वर्षांनंतर परदेशात कसोटी सामन्यात दोन्ही डाव घोषित करण्याचे धाडस केले. पहिला डाव 7 बाद 443 धावसंख्येवर घोषित केला. त्यानंतर टीम इंडियाने दुसरा डावही 8 बाद 106 धावांवर घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य दिले. याआधी 2004मध्ये सिडनी कसोटीत हिंदुस्थानने दोन्ही डाव घोषित केले होते. त्या वेळी हिंदुस्थानने पहिल्या डावात 7 बाद 705, तर दुसर्या डावात 2 बाद 211 धावांवर डाव घोषित केले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने ती कसोटी ड्रॉ करण्यात यश मिळविले होते.
फलंदाजीतही कमाल
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने दुसर्या डावात ‘टीम इंडिया’च्या सहा फलंदाजांना बाद केल्यानंतर फलंदाजीतही कमाल केली. त्याने 103 चेंडूंना सामोरे जाताना एका षटकारासह 5 चौकार लगावत नाबाद 61 धावांची खेळी केली. कमिन्सच्या जिगरबाज फलंदाजीमुळेच ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी पराभवाची नामुष्की टाळली. त्याने मिचेल स्टार्कच्या साथीने ऑस्ट्रेलियाला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. मोहम्मद शमीने स्टार्कचा (18) त्रिफळा उडवून हिंदुस्थानला 8वे यश मिळवून दिले. मात्र त्यानंतर कमिन्सने नॅथन लायनच्या साथीने प्रतिकार करीत हिंदुस्थानी गोलंदाजांना आणखी यश मिळू दिले नाही. ऑस्ट्रेलियाने 77 षटकांत 8 बाद 229 धावा केल्यानंतर पंचांनी अर्ध्या तासाचा खेळ वाढविला. मात्र पुढील 8 षटकांतही हिंदुस्थानला ही जोडी फोडता आली नाही. हिंदुस्थानकडून रवींद्र जाडेजाने 3, तर जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी 2-2 फलंदाज बाद केले. इशांत शर्माने एक बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान पहिला डाव : 7 बाद 443 धावा
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 151 धावा
हिंदुस्थान दुसरा डाव : 8 बाद 106 धावा
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : 8 बाद 258 धावा




























































