
इंग्लंडचा संघ या महिन्याच्या शेवटी कसोटी क्रिकेट मालिकेसाठी हिंदुस्थानच्या दौऱयावर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टॉने माइंड गेम खेळायला सुरुवात केली आहे. ‘हिंदुस्थानकडे सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी ताफा आहे. त्यामुळे आमच्याविरुद्ध त्यांनी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ा बनविल्या तर ही रणनीती हिंदुस्थानच्याच अंगलट येईल,’ असे मत बेअरस्टॉने व्यक्त केले. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे. एका स्पोर्ट्स चॅनलवर बोलताना म्हणाला, ‘हिंदुस्थान आमच्याविरुद्ध फिरकीला अनुकूल अशा खेळपट्टय़ा बनवतील असे मला वाटते. पहिल्या दिवसापासूनच चेंडू खेळपट्टीवर फिरण्याची शक्यता आहे, मात्र अशा फिरकी खेळपट्टय़ा हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांसाठीही मारक ठरतील. आमच्याकडे फिरकीचा समर्थपणे सामना करू शकतील असे फलंदाज आहेत, असा इशाराही जॉनी बेअरस्टॉने दिलाय.



























































