IND vs ENG Test – रुटच्या निशाण्यावर तेंडुलकरचा विक्रम, विराटलाही मोठी संधी

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेमध्ये सर्वांचे लक्ष विराट कोहली आणि जो रुट या दोन दिग्गज खेळाडूंवर असणार आहे. गेल्या मालिकेमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या संघासाठी दमदार कामगिरी केली होती. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या कसोटी लढतीत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉपच्या 5 खेळाडूंमध्येही या दोघांचा समावेश आहे. यामध्ये टॉपचे स्थान पटाकवण्याची रुटला, तर कुक आणि गावस्कर यांना मागे सोडण्याची संधी विराटकडे आहे.

दोन्ही उभय देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या कसोटी लढतीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 32 कसोटीतील 53 डावात फलंदाजी करताना 2535 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 7 शतकांचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या रुटने 25 कसोटीत 45 डावात फलंदाजी करताना 7 शतक आणि 10 अर्धशतकांच्या मदतीने 2526 धावा केल्या आहेत. सचिनला मागे टाकण्यासाठी रुटला फक्त 10 धावांची आवश्यकता असून आगामी मालिकेत तो हा टप्पा गाठेल.

या यादीमध्ये सुनील गावस्कर तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी 38 कसोटीतील 67 डावात फलंदाजी करताना 2483 धावा केल्या आहेत. तर एलेस्टर कुकने 30 कसोटीतील 54 डावात फलंदाजी करताना 2431 धावा केल्या आहेत. कोहलीने 28 कसोटीतील 50 डावात फलंदाजी करताना 1991 धावा केल्या आहेत. आगामी मालिकेत त्याने 440 धावा फटकावताच तो कुकला आणि 492 धावा फटकातच गावस्कर यांना मागे टाकेल.

रोहितला हजारी मनसबदार होण्याची संधी

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा यालाही इंग्लंडविरुद्ध एक हजार धावा फटकावण्याची संधी आहे. त्याने आतापर्यंत 9 कसोटीतील 17 डावात फलंदाजी करताना 747 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.