हिंदुस्थानने केली बांगलादेशची शिकार, हार्दिकचे अर्धशतक; बुमराह, कुलदीपची अचूक गोलंदाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने फलंदाजीत जबरदस्त फटकेबाजी केल्यानंतर आपल्या गोलंदाजीच्या जाळय़ातही अचूक अडकवत बांगलादेशची 50 धावांनी सहज शिकार केली. सुपर-8 फेरीतील या लागोपाठच्या विजयामुळे रोहित शर्माच्या सेनेने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केलीय. सुपर-8 फेरीतील लागोपाठच्या दोन पराभवांसह बांगलादेशचे टी-20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले. उद्या (दि. 23) सकाळी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला हरविल्यास सुपर-8 फेरीच्या पहिल्या गटातून हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचे तिकीट बुक करतील. हार्दिक पंडय़ाचे झुंजार अर्धशतक आणि जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव यांची भन्नाट गोलंदाजी ही हिंदुस्थानच्या विजयाची प्रमुख वैशिष्टय़े ठरली. अर्धशतकी खेळीसह एक बळी टिपणारा हार्दिक पंडया या सामन्याचा मानकरी ठरला.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला 8 बाद 146 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून कर्णधार नजमुल होसैन सॅण्टोने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तंझीद हसन (29) व रिशाद होसैन (24) हे इतर धावांची विशी ओलांडणारे फलंदाज ठरले. हिंदुस्थानकडून डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक 3 बळी टिपले. जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंह यांना 2-2, तर हार्दिक पंडय़ाला एक बळी मिळाला.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 5 बाद 196 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. रोहित शर्मा (21) व विराट कोहली या आजी-माजी कर्णधारांनी टीम इंडियाला 3.4 षटकांत 39 अशी वेगवान सुरुवात करून दिली. दोघांनीही मेहंदी हसन व शाकिब अल हसन या गोलंदाजांवर हल्ला चढविला, मात्र ते मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. रोहितने 11 चेंडूंत 3 चौकारांसह एक षटकार लगावला, तर विराटने 28 चेंडूंत तीन टोलेजंग षटकारासह एक चौकार लगावला. शाकिबने रोहितला जाकेर अलीकरवी झेलबाद केले. तंझीमने विराटचा त्रिफळा उडविला अन् एका चेंडूच्या फरकाने सूर्यकुमार यादवला (6) यष्टीमागे लिटन दासकरवी झेलबाद करून हिंदुस्थानची आघाडीची फळी तंबूत पाठविली.

पंत-दुबेची फटकेबाजी

हिंदुस्थानची आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर रिषभ पंत (36) व शिवम दुबे (34) यांच्यावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. या दोघांनी 19 चेंडूंत 31 धावा फटकाविल्या. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱया पंतने 24 चेंडूंत 4 चौकारांसह एक 2 चेंडू मैदानाबाहेर भिरकावले. रिशाद होसैनने पंतला तंझीमकरवी झेलबाद केले. मग नव्या दमाच्या दुबेने आलेल्या हार्दिक पंडय़ाच्या साथीत (नाबाद 50) चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रिशादच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद होण्यापूर्वी दुबेने 24 चेंडूंत 3 उत्तुंग षटकार ठोकले. त्यानंतर हार्दिक पंडय़ाने अक्षर पटेलच्या (नाबाद 3) हिंदुस्थानला 196 धावसंख्येपर्यंत पोहोचविले. त्याने 27 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांचा घणाघात करीत आपली नाबाद अर्धशतकी खेळी सजविली. बांगलादेशकडून तंझीम हसन व रिशाद होसैन यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर शाकिब अल हसनला एक बळी मिळाला.